Vaibhav Sooryavanshi World Record in T20: वैभव सूर्यवंशीने आपल्या वादळी फटकेबाजीने यंदा सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. वैभव सूर्यवंशीने बड्या बड्या गोलंदाजांविरूद्ध पहिल्याच चेंडूवर षटकार मारत आश्चर्यचकित केलं आहे. राजस्थान रॉयल्स आणि गुजरात टायटन्स यांच्यातील सुरू असलेल्या सामन्यातही वैभव सूर्यवंशीने तेच केलं. मोहम्मद सिराजविरूद्ध पहिल्याच चेंडूवर त्याने षटकार खेचला. हा षटकार मारताच त्याने टी-२० इतिहासात मोठा विक्रम आपल्या नावे केला आहे.

वैभव सूर्यवंशी त्याच्या आक्रमक फटकेबाजीसाठी ओळखला जातो. यंदाच्या स्पर्धेत वैभव राजस्थान रॉयल्स संघाचा पूर्णवेळ सलामीवीर म्हणून खेळत आहे. यादरम्यान १५ चेंडूत त्याने सलग तीन वेळा अर्धशतक झळकावण्याची कामगिरी केली. यानंतर त्याने ३६ चेंडूत शतकदेखील झळकावलं. आता त्याने टी-२० इतिहासातील षटकारांचा मोठा विक्रम आपल्या नावे केला आहे.

वैभव सूर्यवंशीने इतिहास घडवला

वैभव सूर्यवंशीने या सामन्यात पहिलाच षटकार मारताच टी-२० क्रिकेटमध्ये १०० षटकारांचा पल्ला पार केला. वैभव सूर्यवंशी हा टी-२० इतिहासात सर्वात जलद १०० षटकारांचा विक्रम आपल्या नावे करणारा जगातील पहिला फलंदाज ठरला आहे. वैभवने अवघ्या २९ डावांमध्ये आणि ५१४ सामन्यांमध्ये १०० षटकारांचा विक्रम पूर्ण केला. याशिवाय तो टी-२० इतिहासात झटपट १०० षटकार मारणारा तो तरूण फलंदाजही ठरला. त्याने अवघ्या १५ वर्षे ४३ दिवस वय असताना हा विक्रम पूर्ण केला.

गुजरात टायटन्सविरुद्ध १६ चेंडूंमध्ये ३ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने ३६ धावांची खेळी केली. मोहम्मद सिराजच्या षटकात मोठा फटका खेळताना तो झेलबाद झाला. वैभव सूर्यवंशी आता २० वर्षांखालील वयात टी-२० क्रिकेटमध्ये १०० षटकार मारणारा पहिला खेळाडू ठरला आहे. तसेच, तो आयपीएल हंगामाच्या पहिल्या सहा षटकांमध्ये ३० किंवा त्याहून अधिक षटकार मारणारा पहिला खेळाडूही ठरला आहे.

वैभव सूर्यवंशीच्या टी-२० त्याने २९ सामन्यांमध्ये २९ डावांत फलंदाजी केली असून, ५२९ चेंडूंचा सामना करत ४०.७५ च्या सरासरीने चार शतकं आणि तीन अर्धशतकांसह १,१४१ धावा केल्या आहेत. याव्यतिरिक्त, वैभव सूर्यवंशीने १०२ षटकार आणि ९१ चौकार मारले आहेत.