Vaibhav Sooryavanshi World Record: बॉस बेबी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वैभव सूर्यवंशीला अखेरीस आंतरराष्ट्रीय पदार्पणाची संधी मिळाली. मँचेस्टरमध्ये इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या टी-२० सामन्यासाठी जेव्हा भारतीय संघ मैदानात उतरला, तेव्हा सर्वांच्या नजरा एका १५ वर्षीय तरुण खेळाडूवर खिळल्या होत्या. बिहारच्या वैभव सूर्यवंशीला जेव्हा भारतीय टी-२० संघाची ‘कॅप’ देण्यात आली. यासह त्याने अवघ्या १५ वर्षे आणि ९९ दिवस वयाच्या असताना आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. या पदार्पणासह वैभवने वर्ल्ड रेकॉर्डदेखील आपल्या नावे केला. पण वैभव पुन्हा एकदा शॉर्ट बॉलवर स्टंपिंग होत १४ धावांवर बाद झाला.

वैभव सूर्यवंशीने अवघ्या १५ वर्षे आणि ९९ दिवस वय असताना आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. यासह आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारताकडून पदार्पण करणारा तो सर्वात तरूण खेळाडू ठरला आणि मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला त्याने मागे टाकलं. याशिवाय त्याने जागतिक क्रिकेटमध्येही सर्वांना मागे टाकत विश्वविक्रम रचला आहे.

वैभव सूर्यवंशीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये घडवला इतिहास

वैभव सूर्यवंशी हा आयसीसीच्या (ICC) पूर्ण सदस्य असलेल्या कोणत्याही देशाकडून टी-२० आंतरराष्ट्रीय सामना खेळणारा जगातील सर्वात तरुण खेळाडू ठरला आहे. क्रिकेट खेळणारे एकूण १२ पूर्ण सदस्य देश आहेत; यामध्ये भारत, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड, श्रीलंका, वेस्ट इंडीज, बांगलादेश, अफगाणिस्तान, आयर्लंड आणि झिम्बाब्वे यांचा समावेश होतो. तर इतर अनेक ‘असोसिएट’ (सहयोगी) देशांनाही ‘टी-२० आंतरराष्ट्रीय’ दर्जा देण्यात आला असला, तरी पूर्ण-सदस्य देशांमधील क्रिकेटचा दर्जा आणि त्यातील दडपण हे पूर्णपणे वेगळं असतं.

वैभव सूर्यवंशीच्या आधी, पूर्ण सदस्य देशांमधील केवळ दोनच खेळाडूंना वयाच्या १६ व्या वर्षी टी-२० आंतरराष्ट्रीय सामना खेळता आला होता. यापूर्वी हा विक्रम आयर्लंडचा वेगवान गोलंदाज जोश लिटलच्या नावावर होता; त्याने २०१६ मध्ये म्हणजेच जवळपास एका दशकापूर्वी ब्रॅडी येथे हाँगकाँगविरुद्ध १६ वर्षे ३०९ दिवस वय असताना पदार्पण केलं होतं. दरम्यान, २०१८ मध्ये अफगाणिस्तानचा ‘मिस्ट्री स्पिनर’ मुजीब उर रहमानने १६ वर्षे आणि ३१४ दिवस इतक्या कमी वयात शारजाह येथे झिम्बाब्वेविरुद्ध आपला पहिला सामना खेळला होता. वैभवने त्या दोघांनाही खूप मागे टाकत एक नवा विक्रम प्रस्थापित केला आहे.

पूर्ण सदस्य देशांमधून अगदी लहान वयात टी-२० पदार्पण करणाऱ्या क्रिकेटपटूंच्या यादीत अफगाणिस्तान आणि पाकिस्तानच्या खेळाडूंचं वर्चस्व आहे. या यादीत अफगाणिस्तानचा उत्कृष्ट लेग-स्पिनर रशीद खान चौथ्या स्थानावर आहे; त्याने २०१५ मध्ये बुलावायो येथे झिम्बाब्वेविरुद्ध अवघ्या १७ वर्षे आणि ३६ दिवस वय असताना पदार्पण केलं होतं. पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज मोहम्मद आमिरने २००९ च्या टी-२० विश्वचषकादरम्यान ‘द ओव्हल’ येथे इंग्लंडविरुद्ध १७ वर्षे ५५ दिवस वय दिवशी पदार्पण करून खळबळ उडवून दिली होती आणि या यादीत तो पाचव्या स्थानावर आहे.