Fastest Team Fifty In IPL: आयपीएल २०२६ स्पर्धेतील १३ वा सामना राजस्थान रॉयल्स आणि मुंबई इंडियन्स या दोन्ही संघांमध्ये सुरू आहे. हा सामना गुवाहाटीतील बारसापारा क्रिकेट स्टेडियममध्ये सुरू आहे. हा सामना नियोजित वेळेनुसार ७:३०ला सुरु होणार होता. पण पावसाने हजेरी लावल्याने सामना ३ तास उशिराने सुरु झाला. आधी पावसाने तुफान फटकेबाजी केली. त्यानंतर फलंदाजीसाठी आलेल्या वैभव सूर्यवंशी आणि यशस्वी जैस्वालने चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडला. यादरम्यान राजस्थान रॉयल्सने मोठा रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे.
या सामन्यात मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पंड्याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पावसामुळे वेळ वाया गेल्याने हा सामना ११-११ षटकांचा खेळवण्याचा निर्णय घेण्यात आला. खेळपट्टीचा अंदाज येईल, असं कारण सांगून त्याने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. पण वैभव सूर्यवंशी आणि यशस्वी जैस्वाल या युवा फलंदाजांच्या जोडीने पहिल्या चेंडूपासूनच मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांवर हल्लाबोल केला. यादरम्यान राजस्थान रॉयल्स संघाने अवघ्या २.४ षटकात सांघिक अर्धशतक पूर्ण केलं.
राजस्थान रॉयल्सचा संघ आयपीएलमध्ये सर्वात वेगवान सांघिक अर्धशतक झळकावणारा संयुक्तरित्या दुसराच संघ ठरला आहे. याआधी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने २०११ मध्ये कोची टस्कर्स केरळ संघाविरूद्ध खेळताना अवघ्या २.३ षटकात सांघिक अर्धशतक पूर्ण केलं होतं. २०२३ मध्ये राजस्थान रॉयल्स संघाने कोलकाता नाईट रायडर्सविरूद्ध खेळताना २.४ षटकात सांघिक अर्धशतक पूर्ण केलं होतं. तर दिल्ली कॅपिटल्सने २०२४ मध्ये, सनरायझर्स हैदराबादने २०२४ मध्ये २.४ षटकात सांघिक अर्धशतक पूर्ण केलं होतं. आता राजस्थान रॉयल्स संघाने पुन्हा एकदा २.४ षटकात हा कारनामा केला आहे.
आयपीएल इतिहासातील सर्वात वेगवान सांघिक अर्धशतके (५० धावा):
२.३ षटके: आरसीबी (RCB) विरुद्ध कोची टस्कर्स केरळ, बेंगळुरू, २०११
२.४ षटके: राजस्थान रॉयल्स (RR) विरुद्ध केकेआर (KKR), कोलकाता, २०२३
२.४ षटके: दिल्ली कॅपिटल्स (DC) विरुद्ध मुंबई इंडियन्स (MI), दिल्ली, २०२४
२.४ षटके: सनरायझर्स हैदराबाद (SRH) विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स (DC), दिल्ली, २०२४
२.४ षटके: राजस्थान रॉयल्स (RR) विरुद्ध मुंबई इंडियन्स (MI), गुवाहाटी, २०२६
