Vaibhav Suryavanshi 32 Balls Hundred in Asia Cup Rising Stars 2025: रायझिंग स्टार आशिया कप २०२५ स्पर्धेला सुरुवात झाली आहे. या स्पर्धेत भारतीय संघ जितेश शर्माच्या नेतृत्तवाखाली खेळत आहे. भारतीय संघ युएईविरुद्ध सामन्याने मोहिमेची सुरुवात केली आहे. पहिल्याच सामन्यात सलामीवीर वैभव सूर्यवंशीने शतकी खेळी करत गोलंदाजांचा धुव्वा उडवला.

दोहामधील वेस्ट एन्ड पार्क इंटरनॅशनल स्टेडियममध्ये हा सामना खेळवला जात आहे. भारत अ संघाने सामन्याची नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. जो संघासाठी अगदी योग्य ठरला आणि भारताने २९७ धावांचा डोंगर उभारला. सूर्यवंशीच्या शतकासह भारताच्या इतर फलंदाजांनीही महत्त्वपूर्ण योगदान दिलं आहे.

वैभव प्रियांश आर्यसह सलामीला उतरले. प्रियांश १० धावा करत धावबाद झाला. पण यानंतर वैभव सूर्यवंशीने गोलंदाजांची शाळा घ्यायला सुरुवात केली. त्याने सुरुवातीला अवघ्या १७ चेंडूत अर्धशतक झळकावलं. इतक्यावर तो थांबला नाही, यानंतर त्याने चौकार षटकारांचा पाऊस पाडत अवघ्या ३२ चेंडूत शकत पूर्ण करत वादळी खेळी साकारली.

शतकानंतरही वैभव सूर्यवंशीची बॅट थांबली नाही, त्याने एका षटकात ३० धावा चोपत झपाट्याने संघाच्या धावसंख्येत भर घातली. वैभव झेलबाद होण्यापूर्वी त्याने ४२ चेंडूत ११चौकार व १६ षटकरांच्या मदतीने १४४ धावांची शानदार खेळी केली.

वैभव सूर्यवंशी नमन धीरची विक्रमी भागीदारी

वैभव सूर्यवंशी व नमन धीर यांनी १५० अधिक धावांची भागीदारी रचली. नमन धीरने २३ चेंडूत ३ चौकार व २ षटकारांसह ३४ धावांची खेळी केली. याशिवाय कर्णधार जितेश शर्माने या सामन्यात ३२ चेंडूत ८ चौकार व ६ षटकार लगावत ८३ धावांची झटपट खेळी केली. वैभव व जितेशच्या वादळी खेळीसह भारताने २० षटकांत ४ बाद २९७ धावा केल्या आहेत.

१४ वर्षीय वैभव सूर्यवंशी उत्कृष्ट फॉर्मात असून त्याने गेल्या काही काळात उत्कृष्ट खेळी केल्या आहेत. आयपीएलमध्ये शतक केल्यानंतर त्याने युथ वनडे आणि युथ टेस्टमध्येही शतकी खेळी केली. यानंतर आता त्याने भारतीय अ संघाकडून खेळताना शतक झळकावत शतकांचा सिलसिला कायम ठेवला आहे.