Vaibhav Suryavanshi 2nd Fastest IPL Fifty: वैभव सूर्यवंशीने यंदाच्या आयपीएलमधील आपला वादळी फॉर्म कायम ठेवला आहे. राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात सामना खेळवला जात आहे. या सामन्यात वैभव सूर्यवंशी इम्पॅक्ट प्लेअर म्हणून दुसऱ्या डावात फलंदाजीला उतरला आणि त्याने आपल्या वादळी फटकेबाजीच्या बळावर १५ चेंडूत अर्धशतक झळकावलं. आयपीएल इतिहासातील हे दुसरं सर्वात जलद अर्धशतक आहे.

आरसीबीने प्रथम फलंदाजी करताना दिलेल्या २०२ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना राजस्थान रॉयल्सला वैभव सूर्यवंशीला दणक्यात सुरूवात करून दिली. वैभवने जसप्रीत बुमराहनंतर आता या सामन्यात जोश हेझलवूड आणि भुवनेश्वर कुमारसारख्या मोठ्या गोलंदाजांविरूद्ध चौकार आणि षटकारांचा वर्षाव केला. त्याने जोश हेझलवूडच्या सलग चार चेंडूंवर चार चौकार लगावत १८ धावा कुटल्या आणि अवघ्या १५ चेंडूंमध्ये आपले अर्धशतक पूर्ण केलं.

वैभव सूर्यवंशीने पॉवरप्लेमध्येच १५ चेंडूत आपलं अर्धशतक पूर्ण केलं. त्याने १५ चेंडूत ५ चौकार ४ षटकारांसह त्याने अर्धशतक पूर्ण केलं. यासह राजस्थान रॉयल्सने पॉवरप्लेमध्ये १ विकेट गमावत ९७ धावांचा डोंगर उभारला. वैभव सूर्यवंशीच्या साथीने ध्रुव जुरेलने देखील वादळी फटकेबाजी करत आरसीबीच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली आहे.

वैभवने भुवनेश्वर कुमारच्या गोलंदाजीवर एक शानदार स्ट्रेट ड्राईव्ह मारून आपल्या डावाची सुरुवात केली. डावाच्या दुसऱ्याच षटकात यशस्वी जैस्वाल बाद झाला, पण त्याचा वैभव सूर्यवंशीवर काही परिणाम झाला नाही. त्याने दुसऱ्या टोकावरून आपली प्रभावी फलंदाजी सुरू ठेवत जोश हेझलवूडच्या एकाच षटकात १८ धावा केल्या. पुढच्या षटकात त्याने भुवनेश्वरच्या गोलंदाजीवर मोठे फटके खेळले. वैभवने या षटकात दोन षटकार आणि एका चौकाराच्या मदतीने १६ धावा केल्या.

सर्वात जलद अर्धशतक करण्याच्या विक्रमात वैभवने आता आयपीएलमध्ये संयुक्तपणे तिसरं स्थान पटकावलं आहे. भारतीय फलंदाजांमध्ये सर्वात जलद आयपीएल अर्धशतकाचा विक्रम यशस्वी जैस्वालच्या नावावर आहे. त्याने २०२३ मध्ये केकेआरविरुद्ध अवघ्या १३ चेंडूंमध्ये अर्धशतक झळकावले होते. केएल राहुल दुसऱ्या स्थानावर आहे. त्याने २०१८ मध्ये पंजाब किंग्सकडून खेळताना दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध १४ चेंडूंमध्ये अर्धशतक झळकावलं होतं. युसूफ पठाणने २०१४ मध्ये हैदराबादविरुद्ध आणि वैभवने या आयपीएलमध्ये दोनदा १५ चेंडूंमध्ये अर्धशतक पूर्ण केलं आहे.

आयपीएलमधील भारतीय फलंदाजांची सर्वात जलद अर्धशतकं

१३ चेंडू – यशस्वी जैस्वाल (आरआर) वि केकेआर, कोलकाता, २०२३
१४ चेंडू – केएल राहुल (पीबीकेएस) वि डीसी, मोहाली, २०१८
१५ चेंडू – युसूफ पठाण (केकेआर) वि एसआरएच, कोलकाता, २०१४
१५ चेंडू – वैभव सूर्यवंशी (RR) वि सीएसके, गुवाहाटी, २०२६
१५ चेंडू – वैभव सूर्यवंशी (RR) विरुद्ध आरसीबी, गुवाहाटी, २०२६*