Vaibhav Suryavanshi Hundred in IND vs SA U19 3rd Odi: भारत आणि दक्षिण आफ्रिका अंडर-१९ संघांमध्ये वनडे मालिका खेळवली जात आहे. भारतीय संघाने तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील सुरूवातीचे दोन्ही सामने जिंकत मालिका आपल्या नावे केली आहे. यानंतर तिसरा वनडे सामना आज खेळवला जात असून या सामन्यात कर्णधार वैभव सूर्यवंशीने वादळी फटकेबाजीच्या जोरावर शतक झळकावलं आहे. यासह भारताने एकही विकेटन गमावता २०० अधिक धावा केल्या आहेत.
वैभव सूर्यवंशीने ६३ चेंडूत ८ षटकार आणि ६ चौकारांच्या मदतीने वादळी शतक झळकावलं. तर वैभव सूर्यवंशी व सलामीला उतरलेल्या अॅरोन जॉर्ज या दोघांनी मिळून पहिल्या विकेटसाठी २०० अधिक धावांची भागीदारी रचली आहे. वैभव सूर्यवंशीने दक्षिण आफ्रिकेच्या संघाविरुद्ध शतक झळकावून अंडर-१९ विश्वचषकापूर्वी आपली तयारी अधिक चोख करताना दिसत आहे.
वैभव सूर्यवंशीने या सामन्यात ७४ चेंडूत ९ चौकार आणि १० षटकारांच्या मदतीने १२७ धावांची झंझावाती खेळी केली. यानंतर वैभवने हेल्मेट काढत आभाळाकडे पाहिलं आणि बॅट गळ्याच्या भोवती फिरवत ‘काट डालूंगा’ स्टाईलमध्ये अनोखं सेलिब्रेशन केलं. यानंतर त्याने दोन्ही हात वर उंचावत शतकाचा आनंद साजरा केला.
वैभव सूर्यवंशीनंतर त्याचा सलामी जोडीदार अॅरोन जॉर्ज याने १५ चौकारांच्या मदतीने ९१ चेंडूत शतक झळकावलं. वैभव सूर्यवंशी बाद होण्यापूर्वी अॅरोन जॉर्जसह त्याने १५४ चेंडूत पहिल्या विकेटसाठी २२७ धावांची भागीदारी रचली. यासह भारताचा अंडर-१९ संघ मोठी धावसंख्या गाठण्याच्या तयारीत आहे.
कर्णधार आयुष म्हात्रे दुखापतीमुळे या मालिकेबाहेर असल्याने वैभव सूर्यवंशीच्या खांद्यावर संघाची धुरा देण्यात आली आहे. वैभव सूर्यवंशीने त्याच्या नेतृ्त्त्वाखाली अंडर-१९ भारतीय संघाला मालिका जिंकून दिली आहे. वैभवची बॅट पहिल्या सामन्यात शांत होती, पण दुसऱ्या सामन्यात त्याने २४ चेंडूत ६८ धावांची खेळी करत संघाला विजयाचा पाया रचून दिला. भारताने हा सामना डीएलएस पद्धतीने ८ विकेट्सने जिंकला, तसेच पहिला सामना डीएलएस पद्धतीने २५ धावांनी जिंकला होता. अशाप्रकारे, भारताने मालिका २-० ने जिंकली.
