Vaibhav Suryavanshi Award: १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीने आपल्या आक्रमक फलंदाजीच्या जोरावर क्रिकेट विश्वात आपल्या नावाचा डंका वाजवला. टी-२० क्रिकेटमध्येही त्याने लहान वयातच शतकांचा पाऊस पाडत विश्वविक्रम नावे केला आहे. २०२५-२६ च्या विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात वैभव सूर्यवंशीने बिहारसाठी १०९ धावांची वादळी खेळी केली आणि त्याच्या लिस्ट ए कारकिर्दीतील पहिलं शतक झळकावण्यात तो यशस्वी झाला. यानंतर आता त्याला राष्ट्रपतींकडून खास पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. आहे.

वैभवने अरुणाचल प्रदेशविरुद्ध विजय हजारे ट्रॉफीमधील सामन्यात ८४ चेंडूत १५ षटकार आणि १६ चौकारांसह १९० धावा केल्या आणि त्याचा स्ट्राईक रेट २२६.१९ होता. यासह बिहार संघाने लिस्ट ए क्रिकेट इतिहासातील सर्वात मोठी धावसंख्या उभारत वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे. यानंतर त्याला आता दिल्लीत खास पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं, त्यामुळे तो दुसऱ्या फेरीतील सामन्याला मुकला आहे.

अरुणाचल प्रदेशविरुद्ध इतक्या शानदार खेळीनंतर, वैभव आता विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेच्या २०२५-२६ च्या या हंगामात बिहारकडून खेळताना दिसणार नाही. वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यानंतर दिल्लीसाठी रवाना झाला. देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते त्याला विशेष पुरस्कार देण्यात आला, ज्याचा फोटो आता समोर आला आहे.

वैभवला पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे आणि हा विशेष पुरस्कार २६ डिसेंबर रोजी नवी दिल्लीतील राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते प्रदान केला गेला. यानंतर वैभव सूर्यवंशी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीला देखील जाणार आहे. हा विशेष सन्मान स्वीकारण्यासाठी, वैभव पहिल्या सामन्यानंतर थेट दिल्लीला पोहोचला.

वैभव त्यानंतर भारताच्या १९ वर्षांखालील संघात सामील होईल. भारताचा अंडर-१९ संघ दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर जाणार आहे. ४ ते ९ जानेवारी दरम्यान तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेसाठी ३० डिसेंबर रोजी भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेला रवाना होईल. आगामी अंडर-१९ वर्ल्डकपच्या दृष्टीने ही मालिका महत्त्वाची असणार आहे.