Vaibhav Suryavanshi Booed By Pakistan Fans: युवा फलंदाज आयुष म्हात्रेच्या नेतृ्त्वाखाली खेळताना भारतीय अंडर १९ संघाने दुबईत पार पडलेल्या अंडर १९ आशिया कप स्पर्धेत दमदार कामगिरी केली. पण स्पर्धेतील स्पर्धेतील अंतिम सामन्यात भारतीय संघाला पाकिस्तानकडून एकतर्फी पराभवाचा सामना करावा लागला. भारतीय संघाला हा सामना जिंकण्यासाठी ३४८ धावा करायच्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाने हा सामना १९१ धावांनी गमावला. या सामन्यात सलामीवीर फलंदाज वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा होती. पण दोघेही फ्लॉप ठरले. या सामन्यानंतर वैभव सूर्यवंशीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

सलामीला आलेल्या वैभवने धावांचा पाठलाग करताना १० चेंडूत २६ धावांची खेळी केली. तो अली राजाच्या गोलंदाजीवर बाद होऊन माघारी परतला. वैभव बाद झाल्यानंतर भारतीय संघाचा डाव पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे कोसळला. मोठ्या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघाचा डाव २६.२ षटकात अवघ्या १५६ धावांवर आटोपला.

भारत आणि पाकिस्तान सामन्यात वाद होणं ही काही नवीन गोष्ट नाही. याआधी भारत आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या आशिया चषक स्पर्धेतील सामन्यातही वाद झाला होता. पण यावेळी पाकिस्तानच्या क्रिकेट समर्थकांनी मर्यादा ओलांडली आहे. ज्यावेळी भारतीय खेळाडू सामना झाल्यानंतर बाहेर जात होते, त्यावेळी पाकिस्तानी समर्थक वैभव सूर्यवंशीला चिडवताना दिसून आले. व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, मैदान सोडून बाहेर जात असताना पाकिस्तानचे समर्थक त्याला चिडवत आहेत.

पण १४ वर्षीय खेळाडूने समजदारी दाखवून त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं. त्याने त्यांच्याकडे पाहिलं सु्द्धा नाही. पण पाकिस्तानच्या समर्थकांनी चिडवणं थांबवलं नाही. या सामन्यात फलंदाजी करत असताना वैभव सूर्यवंशी आणि पाकिस्तानचा गोलंदाज अली राजा यांच्यात जोरदार राडा झाल्याचे पाहायला मिळाले होते. या सामन्यात वैभव स्वस्तात बाद झाला. त्यावेळी अली राजाने त्याला चिडवलं. मैदानाबाहेर जाताना वैभवने त्याला आपल्या पायाचे बूट दाखवले. एकही शब्द न म्हणता, मैदानाबाहेर निघून गेला.

वैभव सूर्यवंशीची दमदार कामगिरी

वैभव सूर्यवंशीने या स्पर्धेत दमदार कामगिरी केली. त्याने यूएईविरूद्ध झालेल्या सामन्यात ५६ चेंडूंचा सामना करत दमदार शतकी खेळी केली होती. या डावात फलंदाजी करताना त्याने ९५ चेंडूंचा सामना करत १७१ धावांची खेळी केली होती. त्यानंतर मलेशियाविरूद्ध खेळताना त्याने अवघ्या २५ चेंडूत आपलं अर्धशतक पूर्ण केलं होतं. साखळी फेरीत त्याने धावांचा पाऊस पाडला. पण सेमीफायनल आणि फायनलमध्ये त्याची बॅट शांतच राहिली. या स्पर्धेत फलंदाजी करताना त्याने ५२.५० च्या सरासरीने २६१ धावा केल्या.