हरारे : गेल्या चार महिन्यांत आंतरराष्ट्रीय पदार्पण, अपेक्षाभंग, संघातून वगळले जाणे अशा अनेक चढ-उतारांचा सामना करावा लागला असला, तरी आपला आत्मविश्वास कमी झाला नाही, असे भारताचा युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी म्हणाला. आता झिम्बाब्वेविरुद्धच्या ट्वेन्टी-२० मालिकेत दमदार कामगिरी करत संघासाठी मोलाचे योगदान देण्याचा निर्धारही त्याने व्यक्त केला.

‘आयपीएल’मधील उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर वयाच्या अवघ्या १५व्या वर्षी सूर्यवंशीची भारतीय संघात निवड झाली. इंग्लंडविरुद्ध दुसर्‍या ट्वेन्टी-२० सामन्यात त्याने आंतरराष्ट्रीय पदार्पण केले. तीन सामन्यांत त्याला अपेक्षित कामगिरी करता आली नाही. त्यामुळे निर्णायक पाचव्या सामन्यासाठी त्याला वगळण्यात आले.

‘‘गेल्या चार महिन्यांत अनेक चढ-उतार पाहिले. क्रिकेटमध्ये हे घडतच असते आणि पुढेही घडणार. मात्र, मला प्रक्रियेवर विश्वास ठेवून संघासाठी शंभर टक्के योगदान द्यायचे आहे. मला जे मार्गदर्शन हवे असते ते प्रशिक्षक सातत्याने देतात. सरावासाठी सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. त्यामुळे मी खूप समाधानी आहे आणि माझा आत्मविश्वासही कायम आहे,’’ असे सूर्यवंशी म्हणाला.

हरारेचे मैदान खास

झिम्बाब्वेविरुद्ध सूर्यवंशी सलामीला खेळेल. हरारेचे मैदान त्याच्यासाठी खास ठरले आहे. त्याने याच वर्षी इंग्लंडच्या १९ वर्षांखालील संघाविरुद्ध युवा विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात ८० चेंडूंत १७५ धावांची थक्क करणारी खेळी केली होती.