Vaibhav Suryavanshi Record: आयसीसी अंडर १९ वर्ल्डकप २०२६ स्पर्धेतील सुपर ६ फेरीतील सामने सुरू आहेत. स्पर्धेतील सहावा सामना भारत आणि झिम्बाब्वे या दोन्ही संघांमध्ये सुरू आहे. या सामन्यातील पहिल्या डावात फलंदाजी करताना वैभव सूर्यवंशीची बॅट चांगलीच तळपली आहे. झिम्बाब्वेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचं आमंत्रण दिल्यानंतर वैभवने दमदार अर्धशतकी खेळी केली. या खेळीसह त्याने मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे.

बुलावायो येथील क्वीन्स पार्कमध्ये सुरू असलेल्या या सामन्यात भारतीय संघाला नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करण्यासाठी यावं लागलं. भारतीय संघाकडून आरोन जॉर्ज आणि वैभव सूर्यवंशी ही जोडी मैदानावर आली. या जोडीकडून दमदार सुरुवातीची अपेक्षा होती. पण आरोन जॉर्ज स्वस्तात माघारी परतला. जॉर्ज २३ धावांवर बाद झाला. त्यामुळे अवघ्या ४४ धावांवर भारतीय संघाला पहिला धक्का बसला. त्यानंतर वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रे यांनी मिळून भारतीय संघाचा डाव सांभाळला. यादरम्यान वैभव सूर्यवंशीने २४ चेंडूत आपलं अर्धशतक झळकावलं. यासह आयसीसी अंडर १९ वर्ल्डकप स्पर्धेत सर्वात जलद अर्धशतकी खेळी करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तो संयुक्तरित्या दुसऱ्या स्थानी पोहोचला आहे.

वैभव सूर्यवंशीने दमदार फलंदाजी करून २४ चेंडूत आपलं अर्धशतक पूर्ण केलं. हे या स्पर्धेतील त्याचं दुसरं अर्धशतक ठरलं. दरम्यान या स्पर्धेच्या इतिहास सर्वात वेगवान अर्धशतकी खेळी करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तो दुसऱ्या स्थानी पोहोचला आहे. या यादीत आयुष म्हात्रे दुसऱ्या स्थानी आहे. आयुष म्हात्रेने देखील २४ चेंडूत अर्धशतकी खेळी केली आहे. तर या यादीत अव्वल स्थानी असलेल्या ऑस्ट्रेलियाच्या विल मलाज्झुकने २३ चेंडूत वेगवान अर्धशतकी खेळी केली होती. आता २४ चेंडूत अर्धशतक झळकावून तो या स्पर्धेत सर्वात वेगवान अर्धशतक झळकावणाऱ्या फलंदाजांच्या यादीत दुसऱ्या स्थानी पोहोचला आहे. याआधी देखील त्याने ३० चेंडूत अर्धशतक झळकावलं होतं. तर इंग्लंडच्या बेन मेयसने ३२ चेंडूत वेगवान अर्धशतक झळकावलं होतं.

आयसीसी अंडर १९ वर्ल्डकप स्पर्धेत वेगवान अर्धशतक झळकावणारे फलंदाज

विल मलाज्झुक (ऑस्ट्रेलिया) – २३ चेंडूत

आयुष म्हात्रे (भारत) – २४ चेंडूत

वैभव सूर्यवंशी (भारत) – २४ चेंडूत

वैभव सूर्यवंशी (भारत) -३० चेंडूत

बेन मेयस (इंग्लंड) – ३२ चेंडूत