Vaibhav Suryavanshi Creates History in IPL: १५ वर्षीय वैभव सूर्यवंशी आयपीएल २०२६ मध्ये आपल्या फलंदाजीने धुमाकूळ घालत आहे. प्रत्येक सामन्यातील आपल्या वादळी खेळीच्या बळावर तो सर्वांचं लक्ष वेधून घेतो. आरसीबीविरूद्ध सामन्यात त्याने १५ चेंडूत अर्धशतक झळकावत मोठ्या विक्रमाची नोंद केली आहे. वैभव सूर्यवंशीने या हंगामात मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीवर दोन षटकार खेचले आणि त्यानंतर आरसीबीविरुद्धच्या सामन्यात जोश हेझलवूडची धुलाई करून लक्ष वेधून घेतलं.

वैभव सूर्यवंशीने १५ चेंडूत अर्धशतक झळकावलं आणि ध्रुव जुरेलबरोबर मिळून त्याने संघाच्या विजयाचा पाया रचला. वैभव सूर्यवंशीने आपल्या खेळीत केवळ २६ चेंडूंचा सामना करत ३०० च्या स्ट्राईक रेटने ७८ धावा केल्या. या खेळीदरम्यान त्याने ८ चौकार व ७ षटकारांसह ही खेळी साकारली. याशिवाय त्याने ध्रुव जुरेलच्या मदतीसह पॉवरप्लेमध्येच ९३ धावांचा पल्ला गाठला होता.

इंडियन प्रीमियर लीगच्या इतिहासात पॉवरप्लेमध्ये सर्वाधिक वेळा ५० किंवा त्याहून अधिक धावांचा विक्रम आता वैभव सूर्यवंशीच्या नावावर आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळूरविरुद्ध अवघ्या १५ चेंडूंमध्ये अर्धशतक पूर्ण करून वैभवने केएल राहुल, यशस्वी जैस्वाल, इशान किशन आणि वृद्धिमान साहा यांना मागे टाकलं. या सर्व खेळाडूंच्या नावावर भारतीय खेळाडू म्हणून आयपीएल पॉवरप्लेमध्ये दोन अर्धशतकं किंवा त्याहून अधिक धावा करण्याचा विक्रम आहे. आयपीएल पॉवरप्लेमध्ये डावांच्या बाबतीत वैभव सूर्यवंशी आता जोस बटलरसोबत संयुक्तपणे अव्वल स्थानी आहे.

वैभव सूर्यवंशी हा आयपीएलच्या पॉवरप्लेमध्ये सर्वाधिक वेळेस अर्धशतक करणारा पहिला भारतीय फलंदाज ठरला आहे. त्याने आतापर्यंत ३ वेळा अर्धशतकं झळकावली आहेत.

आयपीएल पॉवरप्लेमध्ये सर्वाधिक वेळेस पन्नासपेक्षा जास्त धावांच्या खेळी करणारे भारतीय खेळाडू

वैभव सूर्यवंशी – ३ वेळा
केएल राहुल – २ वेळा
वृद्धिमान साहा – २ वेळा
यशस्वी जैस्वाल – २ वेळा
ईशान किशन – २ वेळा

आरसीबीविरुद्धच्या सामन्यात २०२ धावांचे लक्ष्य गाठताना, वैभव सूर्यवंशी आणि ध्रुव जुरेल यांनी दुसऱ्या विकेटसाठी अवघ्या ३७ चेंडूंमध्ये १७.५१ च्या रनरेटने १०८ धावांची भागीदारी केली. आयपीएलच्या इतिहासातील १०० किंवा त्याहून अधिक धावांची ही दुसरी सर्वात वेगवान भागीदारी आहे. या यादीत अव्वल स्थानी अभिषेक शर्मा आणि ट्रॅव्हिस हेड आहेत, ज्यांनी २०२४ च्या आयपीएल हंगामात दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध ३८ चेंडूंमध्ये २०.६८ च्या रनरेटने १३१ धावांची भागीदारी केली होती.