IPL 2026 Vaibhav Suryavanshi Record: राजस्थान रॉयल्सने आयपीएल २०२६च्या पहिल्याच सामन्यात चेन्नई सुपर किंग्सचा पराभव केला. फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्ही विभागांत राजस्थानची कामगिरी दमदार ठरली. या सामन्यातील आकर्षण ठरला तो १५ वर्षीय युवा खेळाडू वैभव सूर्यवंशी. डावखुऱ्या सलामीवीराने शानदार अर्धशतक झळकावत संघाला ८ विकेट्स आणि ४७ चेंडू राखून विजय मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावली. याशिवाय राजस्थान रॉयल्सच्या गोलंदाजांनी पहिल्या डावात उत्कृष्ट गोलंदाजी करत चेन्नईला १२७ धावांवर सर्वबाद केलं.
वैभव सूर्यवंशीने अवघ्या १७ चेंडूत ५१ धावांची तुफानी खेळी केली, ज्यात ४ चौकार आणि ५ षटकारांचा समावेश होता. त्याने केवळ १५ चेंडूत अर्धशतक पूर्ण करत राजस्थान रॉयल्ससाठी आयपीएल इतिहासातील दुसरं सर्वात जलद अर्धशतक नोंदवलं. याआधी त्याने आयपीएल २०२५मध्ये गुजरात टायटन्सविरुद्ध १७ चेंडूत अर्धशतक झळकावलं होतं. त्यामुळे १८ चेंडूंपेक्षा कमी चेंडूत एकापेक्षा जास्त अर्धशतक करणारा तो या फ्रँचायझीसाठी इतिहासातील पहिला खेळाडू ठरला.
राजस्थान रॉयल्ससाठी आयपीएल इतिहासात सर्वात जलद अर्धशतक करणारे फलंदाज
यशस्वी जैस्वाल – १३ चेंडू वि. केकेआर, कोलकाता २०२३
वैभव सूर्यवंशी – १५ चेंडू वि. सीएसके, गुवाहाटी, २०२६
वैभव सूर्यवंशी – १७ चेंडू वि. जीटी, जयपूर २०२५
जोस बटलर – १८ चेंडू वि. डीडी, दिल्ली २०१८
वैभव सूर्यवंशीचं आयपीएल इतिहासातील तिसरं सर्वात जलद अर्धशतक
वैभव सूर्यवंशीने आयपीएल इतिहासातील संयुक्तपणे तिसऱ्या क्रमांकाचं सर्वात जलद अर्धशतक झळकावलं. या विक्रमात त्याने युसुफ पठाण (कोलकाता विरुद्ध हैदराबाद, २४ मे २०१४), सुनील नरेन (कोलकाता विरुद्ध बेंगळुरू, ७ मे २०१७), निकोलस पूरन (लखनौ विरुद्ध बेंगळुरू, १० एप्रिल २०२३) आणि जेक फ्रेझर-मॅकगर्क दोन वेळा (दिल्ली विरुद्ध हैदराबाद, २० एप्रिल २०२४ तसेच दिल्ली विरुद्ध मुंबई, २७ एप्रिल २०२४) यांच्यासोबत स्थान मिळवलं आहे.
सूर्यवंशीने यशस्वी जैस्वालसोबत ७५ धावांची सलामी भागीदारीही रचली, ज्यात पॉवरप्लेमध्ये राजस्थानने ७४ धावा केल्या. याआधीच १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीने आयपीएल २०२५मध्ये शानदार कामगिरी करत एक शतक आणि दोन अर्धशतकं झळकावली होती. विशेष म्हणजे, आयपीएलमध्ये शतक करणारा सर्वात तरुण खेळाडू होण्याचा विक्रमही त्याच्या नावावर आहे.
