Vaibhav Suryavanshi Century: आयसीसी अंडर -१९ वर्ल्डकप स्पर्धेतील अंतिम सामना भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये सुरू आहे. भारतीय संघाने संपूर्ण स्पर्धेत चॅम्पियन सारखा खेळ करून अंतिम फेरीत प्रवेश केला. या सामन्यात पहिल्या डावात फलंदाजी करण्यासाठी आलेल्या भारतीय संघाकडून वैभव सूर्यवंशीने दमदार शतकी खेळी केली आहे. वैभव सूर्यवंशीने ५५ चेंडूंचा सामना करत आपलं शतक पूर्ण केलं.

या महत्वाच्या सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार आयुष म्हात्रेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय संघाकडून डावाची सुरूवात करण्यासाठी आरोन जॉर्ज आणि वैभव सूर्यवंशीची जोडी मैदानावर आली. भारतीय संघाला सुरूवातीलाच मोठा धक्का बसला. गेल्या सामन्यातील शतकवीर आरोन जॉर्ज अवघ्या ९ धावा करत माघारी परतला. पण त्यानंतर वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेने मिळून भारतीय संघाचा डाव सांभाळला. दोघांनी मिळून दुसऱ्या विकेटसाठी १४२ धावांची भागीदारी केली.

वैभव सूर्यवंशी आपल्या आक्रमक फलंदाजीसाठी ओळखला जातो. पण मोठ्या सामन्यांमध्ये तो नेहमीच फ्लॉप ठरला आहे. पण यावेळी त्याने दाखवून दिलं आहे की, तो देखील मोठ्या सामन्यांतील खेळाडू आहे. भारतीय संघाने गेल्या सामन्यात ३१० धावांचा यशस्वी पाठलाग केला होता. त्या सामन्यात त्याने दमदार अर्धशतकी खेळी केली होती. इंग्लंडविरूद्धच्या अंतिम सामन्यातही त्याने पहिल्या चेंडूपासून इंग्लंडच्या गोलंदाजांवर हल्लाबोल केला. यासह ५५ चेंडूत आपलं शतक पूर्ण केलं. हे या स्पर्धेच्या इतिहासातील दुसरं सर्वात वेगवान शतक ठरलं आहे. अंडर-१९ वर्ल्डकप स्पर्धेत सर्वात वेगवान शतकी खेळी करण्याचा विक्रम हा ऑस्ट्रेलियाच्या विल मालायचुकच्या नावावर आहे. त्याने या वर्ल्डकप स्पर्धेत जपानविरूद्ध झालेल्या सामन्यात ५१ चेंडूत वेगवान शतक झळकावलं होतं. तर वैभव सूर्यवंशीने ५५ चेंडूत आपलं शतक पूर्ण केलं आहे.

अंडर-१९ वर्ल्डकप स्पर्धेत सर्वात वेगवान शतक झळकावणारे फलंदाज

५१ चेंडू – विल मालायचुक (ऑस्ट्रेलिया) विरुद्ध जपान, विंडहोक, २०२६

५५ चेंडू – वैभव सूर्यवंशी (भारत) विरुद्ध इंग्लंड, हरारे, २०२६

६३ चेंडू – कासिम अक्रम (पाकिस्तान) विरुद्ध श्रीलंका, नॉर्थ साउंड, २०२२

६५ चेंडू – बेन मेयस (इंग्लंड) विरुद्ध स्कॉटलंड, हरारे, २०२६

६९ चेंडू – राज बावा (भारत) विरुद्ध युगांडा, तारौबा, २०२२