Vaibhav Suryavanshi Creates History in IPL: राजस्थान रॉयल्सचा १५ वर्षांचा ‘छोटा पॅकेट, बडा धमाका’ असलेल्या वैभव सूर्यवंशी सध्या आयपीएलमध्ये एकापेक्षा एक उत्कृष्ट खेळी करत आहे. जगातील सर्वोत्तम गोलंदाज जसप्रीत बुमराहसमोर अनेक अनुभवी फलंदाज चाचपडतात, पण वैभव मात्र अजिबात डगमगला नाही. मुंबई इंडियन्सविरुद्धच्या पहिल्या भेटीत शून्यावर बाद झाल्याची कसर वैभवने या सामन्यात चोख भरून काढली. वैभवने या सामन्यात १९ चेंडूत ३९ धावांची खेळी करत मोठा विक्रम आपल्या नावे केला आहे.
गुवाहाटीमध्ये पावसाच्या हजेरीमुळे मुंबई आणि राजस्थानमधील सामना उशिरा सुरू करण्यात आला. यासह हा सामना ११-११ षटकांचा खेळवण्यात आला. यादरम्यान राजस्थानच्या दोन्ही सलामीवीरांनी मुंबईविरूद्ध पहिल्या चेंडूपासून हल्लाबोल सुरू केला. वैभवने केवळ १४ चेंडूत ३९ धावांची तुफानी खेळी साकारली. विशेष म्हणजे, आपल्या आयपीएल कारकिर्दीत त्याने जसप्रीत बुमराहचा सामना करताना पहिल्या ३ चेंडूंमध्येच २ उत्तुंग षटकार खेचून सर्वांना अवाक् केलं.
वैभवने अनुभवी यशस्वी जैस्वालसोबत मिळून मुंबईच्या गोलंदाजांचा अक्षरशः धुव्वा उडवला. या जोडीने अवघ्या ३० चेंडूत ८० धावांची सलामी दिली. वैभवच्या या खेळीत ५ षटकार आणि १ चौकाराचा समावेश होता. ५ व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर शार्दुल ठाकूरने त्याला बाद केलं. वैभवचा तो फटकाही सीमापार जाणार असंच वाटत होतं, पण सीमारेषेवर तिलक वर्माने एक अप्रतिम झेल टिपून त्याची खेळी संपवली.या वादळी सुरुवातीमुळे राजस्थान रॉयल्सने ११ षटकांत १५० धावांचा डोंगर उभा केला, जे मुंबईसाठी कठीण आव्हान ठरलं.
वैभव सूर्यवंशीच्या अनोख्या विक्रमाला गवसणी
राजस्थान रॉयल्सचा युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी याने केवळ आपल्या बॅटने धावाच कुटल्या नाहीत, तर आयपीएलच्या इतिहासातील एका मोठ्या विक्रमाला गवसणी घातली आहे. मुंबई इंडियन्सविरुद्धच्या धडाकेबाज खेळीदरम्यान वैभवने असा पराक्रम केला, जो गेल्या ८ वर्षांपासून ऋषभ पंत आणि इशान किशन यांच्या नावावर होता. आयपीएलमध्ये सर्वाधिक षटकार मारणाऱ्या किशोरवयीन (Teenager) खेळाडूंच्या यादीत वैभव आता अव्वल स्थानी पोहोचला आहे.
वैभव सूर्यवंशीने सर्वाधिक ३५ षटकारांची नोंद आपल्या नावे केली आहे. आयपीएल कारकिर्दीत मारलेले ३५ षटकार हे लीगच्या इतिहासातील कोणत्याही तरूण खेळाडूने केलेली सर्वाेत्कृष्ट कामगिरी आहे. जगातील सर्वात श्रीमंत लीगमध्ये वयाच्या विसाव्या वर्षापूर्वी ३० पेक्षा जास्त षटकार खेचणारा वैभव सूर्यवंशी पहिला खेळाडू आहे. या १५ वर्षीय फलंदाजाने गुजरात टायटन्सविरुद्धच्या मागील सामन्यात यष्टीरक्षक-फलंदाज जोडीच्या षटकारांच्या संख्येची बरोबरी केली होती.
आयपीएलमध्ये युवा खेळाडूने मारलेले सर्वाधिक षटकार
वैभव सूर्यवंशी – ३५ षटकार – राजस्थान रॉयल्स, २०२५-२६
इशान किशन – ३० षटकार – गुजरात लायन्स, मुंबई इंडियन्स, २०१६-१८
ऋषभ पंत – ३० षटकार – दिल्ली डेअरडेव्हिल्स, २०१६-१७
संजू सॅमसन – २२ षटकार – राजस्थान रॉयल्स, २०१३-१४
पृथ्वी शॉ – १९ षटकार – दिल्ली कॅपिटल्स, २०१८-१९
