Vaibhav Suryavanshi Dance Video Viral: अंडर-१९ विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात टीम इंडियाने इंग्लंडचा १०० धावांनी पराभव करून विजेतेपद पटकावलं. भारतीय संघाने १९ वर्षांखालील विश्वचषक ट्रॉफी जिंकण्याची ही सहावी वेळ आहे. विश्वचषकाची ट्रॉफी पटकावल्यानंतर, टीम इंडियाच्या खेळाडूंनी त्यांचा विजय एका खास पद्धतीने साजरा केला. सर्व खेळाडू ड्रेसिंग रूममध्ये नाचताना दिसले. दरम्यान सामनावीर ठरलेला वैभव सूर्यवंशी भोजपुरी गाण्यावर थिरकताना दिसला.
भारताचा १४ वर्षीय फलंदाज वैभव सूर्यवंशीने अंडर-१९ विश्वचषकात चमकदार कामगिरी केली. वैभव अंतिम सामन्याचा सामनावीर ठरला आणि त्याचबरोबर त्याला स्पर्धेतील सर्वाेत्तम खेळाडूचा पुरस्कारही मिळाला. १९ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताच्या विजयात वैभव सूर्यवंशीने महत्त्वाची भूमिका बजावली. इंग्लंडविरुद्धच्या अंतिम सामन्यात त्याने ८० चेंडूत १७५ धावांची धमाकेदार खेळी केली, ज्यामध्ये १५ चौकार आणि १५ षटकार मारले.
वैभव सूर्यवंशीशिवाय कर्णधार आयुष म्हात्रेनेही अर्धशतक झळकावलं, बाद होण्यापूर्वी ५३ धावांची महत्त्वपूर्ण खेळी त्याने केली. याशिवाय वैभव-आयुष या जोडगोळीने १४३ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी रचली. यष्टीरक्षक-फलंदाज अभिज्ञान कुंडूने ४० धावांचे योगदान दिले. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना संघाने ४११ धावा केल्या. ४१२ धावांच्या प्रत्युत्तरात इंग्लंडचा संघ ३११ धावांवर आटोपला.
वैभव सूर्यवंशीचा भोजपुरी गाण्यावर डान्स पाहिला का?
वैभव सूर्यवंशीचा एक व्हिडिओ त्याच्या आयपीएल फ्रँचायझी राजस्थान रॉयल्सने सोशल मीडियावर शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये वैभव म्हणत आहे की, “मित्रांनो, मला पंजाबी गाणी समजत नाहीत, आता भोजपुरी गाण वाजणार.” यानंतर त्याने ‘सॉरी सॉरी कहा तारू’ या भोजपुरी गाण्यावर डान्स करताना दिसला. या गाण्याच्या लिरिक्सप्रमाणे अगदी ठुमके मारतानाही वैभव दिसला. वैभव त्याच्या संघातील इतर खेळाडूंसोबत या गाण्यावर नाचताना दिसत आहे.
१९ वर्षांखालील विश्वचषक २०२६ मध्ये युवा टीम इंडियाने उल्लेखनीय कामगिरी केली. या स्पर्धेत भारतीय संघ अपराजित राहिला. गट टप्पा, सुपर सिक्स, सेमीफायनल आणि फायनलमध्ये वर्चस्व गाजवत टीम इंडियाने सहाव्यांदा विश्वचषक जिंकला. फायनल गाठण्यासाठी तर टीम इंडियाने अफगाणिस्तानविरूद्ध सेमीफायनलमध्ये ऐतिहासिक विजय मिळवला.
भारताने यापूर्वी २०००, २००८, २०१२, २०१८ आणि २०२२ मध्ये ही ट्रॉफी जिंकली होती. या विक्रमाकडे पाहता, आतापर्यंत १९ वर्षांखालील विश्वचषकात टीम इंडियाने वर्चस्व गाजवले आहे.
