Vaibhav Suryavanshi Statement on India Win: आयुष म्हात्रेच्या नेतृत्त्वाखालील भारतीय संघाने हरारेमध्ये इतिहास घडवला. टीम इंडियाने अंतिम स्पर्धेत इंग्लंडचा सामन्यात एकतर्फी पराभव करत सहाव्यांदा या ट्रॉफीवर नाव कोरलं. भारताच्या या विजयाचा हिरो ठरला, वैभव सूर्यवंशी. वैभव सूर्यवंशीने या सामन्यात १७५ धावांची वादळी खेळी केली. त्याच्या या खेळीच्या बळावर टीम इंडियाने ४११ धावांचा डोंगर उभारला. वैभव सूर्यवंशीने सामनावीराचा पुरस्कार पटकावल्यानंतर हा पुरस्कार कोणाला समर्पित केला जाणून घेऊया.

कर्णधार आयुष म्हात्रेच्या नेतृत्त्वाखाली टीम इंडियाने फलंदाजीचा निर्णय घेतला. वैभव सूर्यवंशीने सलामीला उतरत ३२ चेंडूत अर्धशतक झळकावलं. यानंतर त्याने ५५ चेंडूत आपलं शतक पूर्ण केलं. यासह वैभव सूर्यवंशी ८० चेंडूत १५ चौकार व १५ षटकारांच्या मदतीने १७५ धावांची उत्कृष्ट खेळी केली. त्याच्या खेळीच्या बळावर आणि आयुष म्हात्रेसह रचलेल्या १४२ धावांच्या जोरावर टीम इंडियाने धावांचा डोंगर उभारला.

वैभव सूर्यवंशी सामनावीर ठरला, तर वैभव स्पर्धेतील सर्वाेत्तम खेळाडू ठरला. वैभव सूर्यवंशीने ७ सामन्यांमध्ये ४३९ धावा केल्या आहेत. वैभव सूर्यवंशी सामनावीर पुरस्कार पटकावल्यानंतर म्हणाला, “खूप छान वाटतंय. संपूर्ण तयारी, सपोर्ट स्टाफने घेतलेली मेहनत, आम्ही खेळलेले सर्व सामने आशिया कप आणि त्यानंतरची मालिका या सगळ्याने आम्हाला या क्षणापर्यंत आणून पोहोचवलं आहे. हा पुरस्कार मी संपूर्ण सपोर्ट स्टाफला समर्पित करू इच्छितो.”

वैभव सूर्यवंशी भारताच्या विजयानंतर काय म्हणाला?

वैभव पुढे म्हणाला, “अनावश्यक दबाव न घेणं हेच आमचं मुख्य उद्दिष्ट होतं. स्पर्धेच्या सुरुवातीपासून आम्ही ज्या प्रक्रियेवर विश्वास ठेवला आहे, त्यावर ठाम राहण्यावर आणि स्वतःवर विश्वास ठेवण्यावर आम्ही लक्ष केंद्रित केलं. तयारीची सुरुवात आशिया कपपासूनच नव्हे, तर त्याही आधीपासून झाली होती. गेल्या आठ ते नऊ महिन्यांपासून सपोर्ट स्टाफ आणि संघ एकत्रितपणे मेहनत घेत आहोत. आज आम्ही ज्या टप्प्यावर आहोत, तिथपर्यंत पोहोचण्यात या तयारीचा मोठा वाटा आहे.”

“माझ्या कौशल्यांबाबत मला पूर्ण आत्मविश्वास आहे. मोठ्या सामन्यांत आणि दबावाखालीही मी कामगिरी करू शकतो, याची मला खात्री आहे. त्यामुळे मी आत्मविश्वास कायम ठेवला आणि स्वतःवरचा विश्वास टिकवून ठेवला,” असं वैभव सूर्यवंशी अखेरीस म्हणाला. वैभव सूर्यवंशीने वयाच्या १४व्या वर्षी अंडर-१९ विश्वचषकाचे जेतेपद पटकावले. त्याने अंतिम सामन्यात शतक करत अनेक विक्रम मोडीत काढले आहेत. वैभव सूर्यवंशी आता आयपीएल २०२६ मध्ये खेळताना दिसणार आहे.