Vaibhav Suryavanshi Six on Jasprit Bumrah First Ball: मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातील सामन्यावर सर्वांच्या नजरा होत्या. पावसाच्या हजेरीमुळे हा सामना उशिराने सुरू झाला आहे. वैभव सूर्यवंशी जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीविरूद्ध कसा खेळणार यावर सर्वांचं लक्ष होतं. पण १५ वर्षांच्या वैभवने मागे पुढे न पाहता बुमराहच्या पहिल्याच चेंडूवर दणदणीत षटकार खेचला आहे आणि सगळेच जण चकित झाले. तर यावर बुमराहची प्रतिक्रियादेखील पाहण्यासारखी होती.
गुवाहाटीमध्ये होत असलेला मुंबई इंडियन्स विरूद्ध राजस्थान रॉयल्स हा सामना पावसामुळे १०.१० ला सुरू झाला. ११-११ षटकांचा सामना खेळवण्यात येत आहे. ज्यामध्ये ३.२ षटकांचा पॉवरप्ले असेल. मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि राजस्थानला फलंदाजीसाठी पाचारण केलं.
राजस्थानकडून वैभव सूर्यवंशी व यशस्वी जैस्वाल ही विक्रमी जोडी फलंदाजीला उतरली. दोघांनी मिळून दणक्यात सुरूवात केली. यशस्वीने दीपक चहरच्या पहिल्या षटकात २२ धावा चोपल्या. यानंतर दुसरं षटक टाकण्यासाठी जसप्रीत बुमराह आला. वैभव सूर्यवंशी जसप्रीत बुमराहविरूद्ध कसा खेळणार यावर सर्वांच्या नजरा होत्या. भले भले दिग्गज फलंदाज जिथे बुमराहविरूद्ध मोठे फटके खेळायला धजावत नाहीत, तिथे वैभवने त्याच्या पहिल्याच चेंडूवर षटकार खेचला.
वैभव सूर्यवंशीने बुमराहला पण नाही सोडलं, पहिल्याच चेंडूवर खेचला षटकार
वैभव सूर्यवंशी बुमराहविरूद्ध पहिल्यांदाच खेळत असल्याने सुरूवातीचे १-२ चेंडू हा १५ वर्षांचा पोरगा खेळून बघेल असं वाटलं होतं, पण वैभवने सर्वांनाच थक्क केलं. बुमराह पहिलाच चेंडू यॉर्कर टाकायला गेला, पण तो मिस झाल्याने वैभवला स्लॉटमध्ये चेंडू मिळाला आणि त्याने लॉन्ग ऑनच्या दिशेने शानदार षटकार खेचला. वैभवने बॅट फिरवताच बुमराहने डोळे बंद केले आणि त्याला कळलं की त्याच्याकडून चूक झाली आणि वैभवने त्याचा फायदा उचलला आहे.
जसप्रीत बुमराहने यानंतर चेंडू पाहिला आणि हसत हसत पुन्हा आपल्या गोलंदाजी मार्कच्या दिशेने पोहोचला. बुमराहच्या चेंडूवरील षटकार पाहून मुंबईचा संघ आणि चाहतेही चकित झाले. तर संघाचे कोचदेखील स्तब्ध बसून राहिले. यानंतर बुमराहच्या त्याच षटकातील चौथ्या चेंडूवर त्याने पुन्हा एक षटकार खेचला. यासह बुमराहच्या दुसऱ्या षटकात वैभवने १४ धावा चोपल्या.
यासह राजस्थान रॉयल्सने ३.२ षटकांत म्हणजेच ११ षटकांच्या पॉवरप्लेमध्ये ५९ धावा करत संघाला दणक्यात सुरूवात करून दिली. पाचव्या षटकात आलेल्या शार्दुल ठाकूरने वैभव सूर्यवंशीला माघारी धाडलं. शार्दुलच्या पहिल्याच चेंडूवर वैभवने षटकार खेचला. यानंतर मुंबईने कमालीची फिल्ड लावत षटकातील अखेरच्या चेंडूवर वैभवला झेलबाद केलं. वैभव १४ चेंडूत ५ षटकार आणि एका चौकारासह ३९ धावा करत बाद झाला.
