l sivaramakrishnan On Vaibhav Sooryavanshi: भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये ५ टी-२० सामन्यांची मालिका सुरु आहे. या मालिकेतील दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला. पण हा सामना भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी अतिशय खास ठरला. कारण ज्या क्षणाची भारतीय क्रिकेट चाहते आतुरतेने वाट पाहत होते, तो ऐतिहासिक क्षण याच सामन्यात पाहायला मिळाला. आयपीएल २०२६ स्पर्धा गाजवणाऱ्या वैभव सूर्यवंशीला वयाच्या १५ व्या वर्षी भारताकडून पदार्पण करण्याची संधी मिळाली. पहिल्या सामन्यात त्याने २ खणखणीत षटकार खेचले. पण तो मोठी खेळी करु शकला नाही. तो अवघ्या १४ धावा करुन माघारी परतला. दरम्यान भारताचे माजी खेळाडू, लक्ष्मी नारायणन शिवरामकृष्णन यांचं म्हणणं आहे की, वैभवला विश्रांती देण्याऐवजी लागोपाठ सामने खेळायची संधी मिळायला हवी.

वैभव सूर्यवंशीने या सामन्यात पदार्पण करताच मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा रेकॉर्ड मोडून काढला आहे. सचिनने वयाच्या १७ व्या वर्षी पदार्पण केलं होतं. तर वैभवने १५ व्या वर्षी पदार्पण करुन हा रेकॉर्ड मोडून काढला आहे. लक्ष्मी नारायणन शिवरामकृष्णन यांच्या मते, त्याला आता संधी दिली आहे तर त्याला सातत्याने खेळायची संधी मिळायला हवी. पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत बोलताना लक्ष्मी नारायणन शिवरामकृष्णन म्हणाले, “त्याला व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये सातत्याने संधी मिळायला हवी. कारण युवा खेळाडूला संघात स्थान दिल्यानंतर विश्रांती देण्यात काहीच अर्थ नाही. त्याला आता विश्रांतीची गरज नाही. त्याने पूर्ण वर्ष खेळावं.”

तसेच ते पुढे म्हणाले, “तुम्ही त्याला खेळवण्याचा निर्णय घेतला आहे, तर त्याला पूर्ण संधी मिळायला हवी. वैभव हा पुढील २० वर्ष भारतीय क्रिकेटसाठी योगदान देऊ शकतो. त्याला मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर, कर्णधार श्रेयस अय्यरची आणि संघातील इतर खेळाडूंच्या समर्थनाची खूप गरज आहे. मला तरी हेच वाटतं की, त्याला योग्य मार्गदर्शन मिळायला हवं.”

येत्या काही महिन्यात दक्षिण आफ्रिकेत वनडे वर्ल्डकप २०२७ स्पर्धेचा थरार रंगणार आहे. वैभवला वनडे क्रिकेटमध्ये खेळण्याची संधी मिळावी अशी मागणी शिवरामकृष्णन यांनी केली आहे. ते म्हणाले, “आता वैभवला इतक्या मोठ्या स्तरावर खेळण्याची संधी मिळाली आहे, तर त्याने आता विचार करायला हवा की समोरचा गोलंदाज त्याच्याविरुद्ध कोणत्या रणनीतीचा वापर करणार आहे. वैभवला वनडे क्रिकेट खेळण्याचीही संधी मिळायला हवी. तो आगामी वनडे वर्ल्डकप २०२७ स्पर्धेसाठी टॉप ऑर्डरचा फलंदाज म्हणून स्वत:ला सिद्ध करु शकतो.”