Vaibhav Suryavanshi IPL Auction Price: आयपीएलचा १८ वा हंगाम आता शेवटच्या टप्प्यात आहे. आज (२९ मे) राजस्थान रॉयल्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात क्वालिफायर २ चा सामना होईल. या सामन्यातील विजेता संघ ३१ मे रोजी अहमदाबादच्या मैदानावर रॉयल चॅलेंज बंगळुरूशी भिडणार आहे. दरम्यान सनरायजर्स हैदराबादला नमवून राजस्थान रॉयल्सने दिमाखात क्वालिफायर २ मध्ये प्रवेश केला. या सामन्यात वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगने जगभरातील क्रिकेटपटूंना विस्मयचकीत केले. एसआरएच विरोधात त्याने केलेली फटकेबाजी अद्वितीय अशी होती. यावर्षी आयपीएलमधील खेळाडूंचा मोठा लिलाव होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर जर वैभव सूर्यवंशी या लिलावात असेल तर त्याच्यावर किती कोटींची बोली लागू शकते, याचा अंदाज काही जणांनी वर्तवला आहे.

अवघ्या १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीने एलिमिनेटर सामन्यात मुल्लानपूर येथील मैदानावर अवघ्या १६ चेंडूत अर्धशतक झळकावले. त्यानंतर अवघ्या २८ चेंडूत तो ९७ धावांवर पोहोचला होता. मात्र प्रफुल हिंगेच्या बॉलवर मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात तो बाद झाला. वैभवच्या आक्रमक सुरुवातीमुळे राजस्थानने २४३ एवढी धावसंख्या रचली. ज्यामुळे गुजरात टायटन्सचा ४७ धावांनी पराभव करणे गोलंदाजांना शक्य झाले.

याच सामन्यात वैभव सूर्यवंशीने क्रिस गेलच्या नावावर असलेला एका हंगामात सर्वाधिक षटकार लगावण्याचा विक्रमही मोडला. त्याने १२ षटकार ठोकले. ज्यामुळे त्याची एकूण षटकाराची संख्या ६५ वर गेली. २०१२ साली क्रिस गेलने एका आयपीएल हंगामात ५९ षटकार मारण्याचा विक्रम केला होता. तो अवघ्या १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीने मोडला आहे.

सूर्यवंशी IPL लिलावात उतरला तर….

भारतीय क्रिकेट संघाचा माजी फिरकीपटू हरभजन सिंगने स्टार स्पोर्ट्सवरील चर्चेत माजी फलंदाज वीरेंद्र सेहवागला लिलावाबद्दल प्रश्न विचारला. “जर वैभव सूर्यवंशी आयपीएल लिलावात उतरला तर त्याच्यावर किती कोटींची बोली लागू शकेल?”, असा प्रश्न हरभजनने विचारला.

vaibhav sooryavanshi angry being impact sub in ipl 2026
वैभव सूर्यवंशी हैदराबादविरूद्ध फलंदाजीला उतरण्यापूर्वीच संतापला होता, RRच्या कोचने केला मोठा खुलासा; संघात नेमकं काय घडलं?

या प्रश्नावर उत्तर देताना जराही वेळ न दवडता सेहवागने उत्तर दिले की, वैभव सूर्यवंशीवर ३० कोटी रुपयांपर्यंत बोली लागू शकते. तर भारताचा माजी फलंदाज आकाश चोप्राने म्हटले की, मी जर असतो तर जराही विचार न करता ही ऑफर घेतली असती.

वैभव सूर्यवंशीला राजस्थान रॉयल्सने १.१० कोटी रुपयांची बोली लावून आपल्या संघात घेतले होते. हे विशेष.

‘वैभवला आताच भारतीय संघात घेतले असते’

वीरेंद्र सेहवागने स्टार स्पोर्ट्सवर बोलत असताना पुढे म्हटले, “मी अशी फलंदाजी कधी पाहिली नाही. मी भारतीय संघासाठी वेगवान शतक केले आहे. पण या मुलाने ज्याप्रकारे फटकेबाजी केली, त्याचा विचारही कुणी केला नसेल. क्रिस गेलचा ५९ षटकारांचा रेकॉर्ड एक १५ वर्षांचा मुलगा मोडत आहे. मी जर सिलेक्टर असतो तर वैभव सूर्यवंशीला आताच भारतीय संघात घेतले असते.”

१५ वर्षीय वैभव सूर्यवंशीचा आपयपीएलचा हा दुसरा हंगाम आहे. या हंगामात त्याने चमकदार कामगिरी केली आहे. १५ सामन्यात त्याने २४२.८६ च्या स्ट्राईक रेटने ६८० धावा केल्या आहेत. या हंगामातील सर्वाधिक धावा करणारा फलंदाज म्हणून ऑरेंज कॅपही त्याने मिळवलेली आहे.

ऋषभ पंतवर आजवर सर्वाधिक बोली

भारताचा यष्टिरक्षक फलंदाज ऋषभ पंतवर आयपीएलच्या आजवरच्या इतिहासातील सर्वाधिक २७ कोटी रुपयांची बोली लावण्यात आली. कोलकाता नाइट रायडर्सला जेतेपद मिळवून देणाऱ्या श्रेयस अय्यरवर २६.७५ कोटी रुपयांची दुसरी सर्वाधिक बोली लागली.