Vaibhav Suryavanshi IPL Performance: राजस्थान रॉयल्सचा तडाखेबाज फलंदाज वैभव सूर्यवंशीच्या नावाने यंदाचा आयपीएल हंगाम ओळखला जाईल. त्याने स्वतःच्या खेळीवर राजस्थान रॉयल्स संघाला क्वालिफायर २ पर्यंत आणले. एलिमिनेटर सामन्यात आंतरराष्ट्रीय कीर्तीचा गोलंदाज पॅट कमिन्स याने वैभव सूर्यवंशीविरोधात रचलेली सर्व व्यूहरचना विफल ठरली. वैभवने २९ चेंडूत ९७ धावा करत एसआरएच संघाला गारद केले. वैभवची निवड आता भारतीय संघात व्हायला हवी, अशी चर्चा असताना त्याच्याबाबत वेगळी माहिती समोर आली आहे.
यंदाच्या आयपीएलमध्ये वैभव सूर्यवंशीने पॅट कमिन्स, जसप्रीत बुमराह, जॉश हेजलवूड आणि रबाडा यासारख्या आंतरराष्ट्रीय किर्तीच्या गोलंदाजांना मोठमोठे षटकार लगावले. १५ सामन्यात ६८२ धावा करत त्याने ऑरेंज कॅपही मिळवली आहे. तर क्रिस गेलचा एका हंगामात सर्वाधिक षटकार लगावण्याचा विक्रमही त्याने मोडला आहे.
मैदानात बॉलर्सवर तुटून पडणारा वैभव घरात मात्र १५ वर्षांच्या मुलासारखाच वागतो. तो जेव्हा घरी असतो तेव्हा त्याला त्याच्या खोलीत निवांत बसून कार्टून पाहायला आवडतं.
जियोस्टारशी संवाद साधताना वैभवने ही माहिती दिली. तो म्हणाला, “दोन ते तीन वर्षांपूर्वी जेव्हा मी सामने खेळून घरी यायचो किंवा सराव करायचो. त्यावेळी घरी असताना मी कार्टून पाहायचो. यात मला खूप आनंद मिळायचा. आताही मला जेव्हा जेव्हा थोडा निवांतपणा हवा असतो, तेव्हा मी कार्टून पाहतो. मी घरी असताना माझ्या खोलीत निवांत पडून राहतो आणि जे कार्टून लागले असेल ते पाहतो. आजही कार्टून पाहताना मला घरी असल्यासारखे वाटते.”
सूर्यवंशीने २०२५ सालच्या आयपीएल हंगामात पहिल्यांदा खेळताना दिसला. आयपीएलमध्ये निवड कशी झाली, याचीही आठवण त्याने सांगितली. तो म्हणाला, संघाचे व्यवस्थापक रोमी भिंदर यांचा मला फोन आला होता. त्यावेळी दुबईमध्ये लिलाव सुरू होता आणि मीही एका स्पर्धेनिमित्त तिथे होतो. त्यांनी मला सांगितले की, मला आयपीएल लिलावासाठी ट्रायल द्यावी लागेल. त्यानंतर ते माझी निवड करतील.
“माझ्या पहिल्याच आयपीएल सामन्यात पहिल्या चेंडूवर मी षटकार लगावला होता. तिसऱ्या सामन्यात मी शतक ठोकले होते. माझ्या मते आयपीएल कारकिर्दीची यापेक्षा चांगली सुरुवात असू शकत नाही. मला जी लय गवसली, तीच पुढे नेण्याचा माझा प्रयत्न आहे”, असेही वैभव सूर्यवंशीने सांगितले.
