Vaibhav Suryavanshi Reaction on His Wicket Video: वैभव सूर्यवंशीने पुन्हा एकदा आपल्या झंझावाती फलंदाजीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. वैभव सूर्यवंशीने राजस्थान रॉयल्स आणि मुंबई इंडियन्स सामन्यात बुमराहच्या पहिल्याच चेंडूवर षटकार खेचत सर्वांनाच थक्क केलं. मुंबईच्या सर्वच दिग्गज गोलंदाजांची धुलाई करत वैभवने झटपट धावा गोळा केल्या. पण त्याचं अर्धशतक मात्र हुकलं. विकेट गमावल्यानंतर त्याने दिलेल्या प्रतिक्रियेने सर्वांचं लक्ष वेधलं आहे.

मुंबई आणि राजस्थान यांच्यातील सामना उशिरा सुरू झाल्याने ११ षटकांचा सामना होत आहे. राजस्थानच्या वैभव सूर्यवंशी व यशस्वी जैस्वालच्या जोडीच्या बळावर संघाने वादळी सुरूवात करत संघाला मोठी धावसंख्या उभारण्यात मदत केली. पॉवरप्लेमध्ये म्हणजेच ३.२ षटकांत राजस्थानने ५९ धावा केल्या आहेत. तर ११ षटकांत राजस्थानने १५० धावा केल्या.

वैभव सूर्यवंशीने बुमराहच्या षटकात दोन षटकार लगावत दणक्यात सुरूवात केली. यानंतर बोल्टच्या षटकात एक षटकार खेचला. यानंतर शार्दुल ठाकूरला दोन षटकार आणि एक चौकार लगावत त्याने ३९ धावा केल्या. यानंतर शार्दुलच्या षटकातील अखेरच्या चेंडूवर मोठा फटका खेळायला गेला आणि झेलबाद झाला. मुंबई इंडियन्सने शार्दुलच्या गोलंदाजीवर कमालीची फिल्ड सेट केली होती आणि वैभवने तिथेच चेंडू मारला आणि झेलबाद झाला.

तिलक वर्माने त्याला झेलबाद केलेलं पाहताच वैभव सूर्यवंशी निराश झाला. अरे यार कशाला, असं म्हणत त्याने हाताने चेहरा लपवला आणि निराशेने खाली वाकला. त्यानंतर तो मैदानावर बॅट आपटत निराश होत मैदानाबाहेर गेला. वैभव सूर्यवंशी बाद झाल्याने त्याचं अर्धशतक हुकलं. वैभव १४ चेंडूत एक चौकार व ५ षटकारांसह ३९ धावा करत बाद झाला.