Vaibhav Suryavanshi Batting In England: भारतीय १९ वर्षांखालील संघातील स्टार फलंदाज वैभव सूर्यवंशी सध्या तुफान फॉर्ममध्ये आहे. भारताचा १९ वर्षांखालील संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. या दौऱ्यावर १४ वर्षीय फलंदाज वैभव सूर्यवंशीच्या दमदार फलंदाजीचा बोलबाला पाहायला मिळाला आहे. भारतीय संघाने ५ वनडे सामन्यांच्या मालिकेतील २ सामने जिंकले आहेत. तर इंग्लंडने १ सामना जिंकला आहे. भारतीय संघ २-१ ने आघाडीवर आहे.

या मालिकेतील तिन्ही सामन्यांमध्ये भारताचा युवा फलंदाज वैभव सूर्यवंशीचा बोलबाला पाहायला मिळाला आहे. आपल्या आक्रमक फलंदाजीसाठी ओळखला जाणाऱ्या वैभवने आयपीएल स्पर्धेत धावांचा पाऊस पाडल्यानंतर आता भारतीय संघासाठी देखील धावांचा पाऊस पाडला आहे. वैभव या मालिकेत भारतीय संघाकडून सर्वाधिक धावा करणारा फलंदाज देखील आहे. तर या मालिकेत सर्वाधिक धावा करणारा तो दुसरा फलंदाज आहे. पुढील दोन्ही सामन्यांमध्ये त्याच्याकडून आणखी चांगल्या कामगिरीची अपेक्षा असणार आहे.

वैभवची दमदार कामगिरी

भारतीय १९ वर्षांखालील संघाकडून डावाची सुरूवात करण्यासाठी येणाऱ्या वैभवने मालिकेतील ३ सामन्यांमध्ये ८४ चेंडूंचा सामना करत १७९ धावा चोपल्या आहेत. यादरम्यान त्याने २१३.०९ च्या स्ट्राईक रेटने धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने १७ षटकार आणि १४ चौकार मारले आहेत.

वैभवने आयपीएल २०२५ स्पर्धेत आपल्याच पहिल्याच हंगामात फलंदाजी करताना षटकारांचा पाऊस पाडला होता. आता इंग्लंडविरूद्ध सुरू असलेल्या वनडे मालिकेतही त्याने षटकारांची मालिका सुरुच ठेवली आहे. त्याने ३ सामन्यांमध्ये १७ षटकार मारले आहेत. तो या मालिकेत सर्वाधिक षटकार मारणारा फलंदाज देखील आहे. मालिकेतील पहिल्या सामन्यात फलंदाजी करताना त्याने १९ चेंडूंचा सामना करत ३ चौकार आणि ५ षटकारांच्या साहाय्याने ४८ धावांची खेळी केली होती. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात त्याने ३४ चेंडूंचा सामना करत ४५ धावांची खेळी केली होती. मालिकेतील तिसऱ्या सामन्यात त्याने ८६ धावांची खेळी केली होती.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतीय संघाने ६ गडी राखून दमदार विजयाची नोंद केली होती. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात इंग्लंडने कमबॅक करत १ गडी राखून विजय मिळवला होता. मालिकेतील तिसऱ्या सामन्यात ४ गडी राखून विजय मिळवत भारतीय संघाने या मालिकेत २-१ ने आघाडी घेतली आहे.