BCCI Receives Urgent Appeal for Vaibhav suryavanshi: वैभव सूर्यवंशीच्या हातात बॅट दिली की चमत्कार घडतात आणि एकापेक्षा एक विक्रम मोडतात. ताशी १५५ किमी वेगाने गोलंदाजी करणाऱ्या वेगवान गोलंदाजांसमोर उभा केलं तरी तो सहज फटकेबाजी करतो. आयपीएलमध्ये फलंदाजीला उतरला की अनुभवी गोलंदाजांनी सजलेल्या विजेतेपद पटकावलेल्या संघांविरुद्धही ३५ चेंडूत शतक ठोकतो. इंग्लंड, ऑस्ट्रेलिया किंवा दक्षिण आफ्रिका कुठेही खेळला तरी सूर्यवंशी तितक्याच दमदार कामगिरीने मैदान गाजवेल. अवघ्या एका वर्षाच्या कारकिर्दीत त्याच्या यशाचं पारडं अपयशापेक्षा खूप जड आहे. त्याची आयपीएल २०२६ मधील पहिल्या सामन्यातील खेळी पाहून बीसीसीआयला अपील करण्यात आलं आहे.
इंग्लंडचा माजी कर्णधार मायकेल वॉ याला वैभव सूर्यवंशीला लवकरात लवकर भारताच्या वरिष्ठ पुरुष संघात स्थान द्यावं असं वाटतं. आयपीएल २०२६च्या तिसऱ्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध १७ चेंडूत ५२ धावांची तुफानी खेळी केल्यानंतर वॉन इतका प्रभावित झाला की सूर्यवंशीने आपल्या वरिष्ठ सलामी जोडीदार यशस्वी जैस्वालचंही लक्ष वेधून घेतलं, असं त्याचं मत आहे.
गेल्या १२ महिन्यांत या डावखुऱ्या फलंदाजाची कामगिरी अफलातून राहिली आहे. कोणत्याही अडचणीशिवाय त्याने भरपूर धावा केल्या आहेत. आयपीएलपुरतंच नाही, तर भारताच्या अंडर-१९ संघाकडून खेळताना इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेतही त्याने शतकं झळकावत आपली छाप पाडली. अंडर-१९ विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात इंग्लंडविरुद्ध केवळ ८० चेंडूत १५ षटकार आणि तितकेच चौकार मारत त्याने १७५ धावांची खेळी करत एकहाती भारताला विजेतेपद मिळवून दिलं.
मायकेल वॉ म्हणाले, “तो भारतासाठी कधी पदार्पण करणार? कदाचित आपण थोडा पुढचा विचार करतोय, कारण आयपीएलमधील ही त्याची पहिलीच खेळी आहे. पण काही महिन्यांत इंग्लंडचा व्हाईट-बॉल दौरा आहे आणि मी भारतीय क्रिकेटच्या जागी असतो, तर त्याला त्या दौऱ्यावर नक्कीच नेलं असतं. तो लगेच सध्याच्या संघातील खेळाडूंची जागा घेईल असं नाही, पण त्याला भारतीय संघाच्या वातावरणाची सवय होणं खूप गरजेचं आहे. त्याला संघात घ्या, त्याला त्या वातावरणात राहू द्या. एक-दोन सामने खेळायला मिळाले तर उत्तमच, पण किमान त्याला दौऱ्यावर घेऊन जा. १५ वर्षांचा असताना त्याला अशा दौऱ्यावर जाण्याची परवानगी आहे का?” असे त्यांनी क्रिकबझवर सांगितलं.
वॉ पुढे म्हणाले, “मी त्याला भारतीय संघासोबत थोडा अनुभव मिळवून दिला असता. लगेच संघात स्थान द्यायचं नाही, जसं मी आधी सांगितलं, पण त्याला संघाच्या वातावरणात ठेवणं महत्त्वाचं आहे. तो खेळण्यासाठी पुरेसा सक्षम आहे, याबद्दल मला अजिबात शंका नाही.”
