Vaibhav Suryavanshi Sixes: भारताचा १४ वर्षीय फलंदाज वैभव सूर्यवंशीने आयपीएल, अंडर-१९ आणि भारतीय अ संघासाठी खेळताना लक्षवेधी कामगिरी केली आहे. या स्पर्धांमध्ये शतकी खेळी करणारा तो सर्वात युवा फलंदाज आहे. या स्पर्धांमध्ये आपल्या फलंदाजीचा डंका वाजवल्यानंतर आता वैभव सूर्यवंशी सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धा खेळण्यासाठी मैदानात उतरला आहे. या स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात चंडीगडविरूद्धच्या सामन्यात फलंदाजी करताना त्याने ३५० च्या स्ट्राईक रेटने तुफान फटकेबाजी केली आणि दमदार कामगिरी केली.
वैभव सूर्यवंशी आपल्या आक्रमक फलंदाजीसाठी ओळखला जातो. या सामन्यातही त्याने ताबडतोड सुरूवात केली. त्याने सुरूवातीचे ३ पैकी २ चेंडू सीमारेषेपार पोहोचवले. २ चेंडूंवर त्याने षटकार खेचले. तर एका चेंडूवर २ धावा घेऊन त्याने ३ चेंडूत १४ धावा केल्या होत्या. त्यामुळे या सामन्यातही तो मोठी खेळी करणार, असं वाटलं होतं. पण १४ धावांवर त्याचा डाव आटोपला. राजस्थान रॉयल्स संघातील मध्यमगती गोलंदाज संदीप शर्माला त्याला बाद करत माघारी धाडलं.
या सामन्यात सकीबुल गनीच्या नेतृत्वाखाली खेळत असलेला बिहारचा संघ डावाची सुरूवात करण्यासाठी मैदानात उतरला. या संघाने २० षटकांअखेर ७ गडी बाद १५७ धावा केल्या. बिहारकडून फलंदाजी करताना कर्णधार गनीने ३६ धावांची खेळी केली. तर बिपिन सौरभने ३६ धावांची खेळी केली. बिहार संघाला चांगली सुरूवात मिळाली होती. पण डावाचा शेवट हवा तसा करता आला नाही. या संघाचा १६० धावांचाही पल्ला गाठता आला नाही. तर चंडीगडकडून गोलंदाजी करताना राज अंगद बावाने ४ षटक गोलंदाजी करून २५ धावा केल्या. तर वैभव सूर्यवंशीला बाद करणाऱ्या संदीप शर्माने ४ षटकात ४८ धावा खर्च केल्या.
चंडीगड संघाला हा सामना जिंकण्यासाठी १५८ धावा करायच्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना फलंदाजीसाठी आलेल्या मनन वोहरा आणि अर्जून आझाने दमदार सुरूवात करून दिली. दोघांनी पहिल्या विकेटसाठी मिळून ७२ धावा जोडल्या. या संघाकडून मनन वोहराने ५० धावांची खेळी केली. तर अर्जूनने ३१ धावा केल्या. त्यानंतर राज अंगद बावाने २२ चेंडूत ३६ धावांची खेळी केली. यासह चंडीगडने १८.४ षटकात दिलेलं आव्हान पूर्ण करून सामना जिंकला.
