Vaibhav Suryavanshi on Bumrah Hazlewood bowling: वैभव सूर्यवंशी आयपीएल २०२६ मध्ये आपल्या वादळी फटकेबाजीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये बड्या बड्या गोलंदाजांना जिथे फलंदाज फटके खेळण्यापूर्वी दोनदा विचार करतात, त्या गोलंदाजांचा या १५ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीने धुव्वा उडवला आहे. वैभवने आतापर्यंत २ वेळा १५ चेंडूत अर्धशतक झळकावत ऑरेंज कॅप पटकावली. याशिवाय आरसीबीविरूद्ध सामन्यातील त्याच्या वादळी खेळीसाठी त्याला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला. या पुरस्कारानंतर त्याने बुमराह, हेझलवुड व भुवनेश्वरविरूद्धच्या फटकेबाजीबाबत मोठं वक्तव्य केलं आहे.

वैभव सूर्यवंशीने आयपीएल २०२६ मध्ये जगातील उत्कृष्ट वेगवान गोलंदाजांपैकी असलेल्या जसप्रीत बुमराहच्या पहिल्याच चेंडूवर दणदणीत षटकार खेचला. यासह त्याच्या षटकात त्याने २ षटकार खेचले. तर जोश हेझलवुडच्या षटकात त्याने ३ चौकार व एका षटकारासह १८ धावा कुटल्या. याशिवाय भुवनेश्वर कुमारच्या षटकात त्याने दोन षटकार खेचले. या दिग्गज गोलंदाजाविरूद्धच्या फटकेबाजीविरूद्ध वैभव काय बोलला, जाणून घेऊया.

सामनावीर पुरस्कार जिंकल्यानंतर वैभव सूर्यवंशी काय म्हणाला?

सामनावीर पुरस्कारानंतर वैभव सूर्यवंशीला विचारलं आज रात्री जाऊन केक कापणार का, यावर तो म्हणाला, “नाही नाही सर, तसं काही नाही. आज आम्हाला थोडं लवकर झोपावं लागणार आहे, कारण उद्या लवकर निघायचं आहे. आमची फ्लाइट लवकर आहे, त्यामुळे सगळं लवकर करावं लागेल. फटकेबाजीबद्दल म्हणाला, मी फक्त सरावात जे करतो, तेच सामन्यात करण्याचा प्रयत्न करतो. काही अतिरिक्त करण्याचा प्रयत्न करत नाही आणि नैसर्गिक खेळ खेळतो.”

बुमराह, हेझलवूड, भुवनेश्वर या गोलंदाजांविरूद्ध फलंदाजी करताना तुला भिती वाटली नाही का, तू पाहिलं नाहीस का कोणता गोलंदाज गोलंदाजी करत आहे? यावर वैभव सूर्यवंशी म्हणाला, “हो मी पाहिलं कोण गोलंदाजी करतोय. डोक्यात कुठेतरी सुरू असतं की कोण गोलंदाजी करतंय, पण मी फक्त चेंडूवर लक्ष देण्याचा प्रयत्न करतो. गोलंदाजाकडे न पाहता, चेंडू कसा आहे, त्यानुसार खेळण्यावर माझं लक्ष असतं.”

सध्या तू लहान आहेस. त्यामुळे तुला सगळ्या गोष्टींमध्ये मार्गदर्शन कोण करतं. यावर वैभव म्हणाला, “सर, माझे वडील आहेत आणि माझे प्रशिक्षक आहेत. इथे रोही सरही माझ्यासाठी मार्गदर्शक आहेत. हे सगळे मला सांगतात की प्रवास खूप मोठा आहे, ही तर फक्त सुरुवात आहे. त्यामुळे प्रक्रियेवर आणि मेहनतीवर लक्ष द्यायचं, इकडे-तिकडे न पाहता खेळावर लक्ष केंद्रित करायचं.”

वैभव सूर्यवंशी बाद झाल्यानंतर नाराज का होतो? केला खुलासा

वैभव सूर्यवंशी आऊट झाल्यावर अनेकदा नाराज दिसतो, याबाबत प्रश्न विचारल्यावर तो म्हणाला, “सर, जर मी खेळपट्टीवर टिकून राहिलो असतो तर अजून १०-२० धावा करू शकलो असतो. लक्ष्याचा पाठलाग करत असू तर सामना दोन षटकं आधी संपवू शकलो असतो किंवा लक्ष्य ठेवताना १०-२० धावा जास्त करू शक. त्यामुळे जेव्हा मी चुकीचा फटका मारून बाद होतो, तेव्हा संघाचं नुकसान होतं. म्हणून थोडं वाईट वाटतं की मी अजून वेळ क्रीजवर राहू शकलो असतो.”