Vaibhav Suryavanshi Record: आयसीसी अंडर-१९ विश्वचषक स्पर्धेत बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात वैभव सूर्यवंशीने बॅटने आणखी एक उल्लेखनीय कामगिरी केली आहे. टीम इंडिया बुलावायोमध्ये बांगलादेशविरुद्ध अंडर-१९ विश्वचषकातील दुसरा गट फेरीचा सामना खेळत आहे. या सामन्यात दबावाच्या स्थितीत वैभव सूर्यवंशीने चांगली फलंदाजी करत संघाला १०० धावांचा पल्ला गाठून दिला. यादरम्यान वैभव सूर्यवंशीने खुद्द विराट कोहलीला मागे टाकलं आहे.

बांगलादेशच्या कर्णधाराने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताने तिसऱ्या षटकात सलग दोन चेंडूत दोन विकेट्स गमावले. यानंतर उपकर्णधारही अवघ्या काही धावा करत झेलबाद झाला. पण एका टोकाकडून वैभव सूर्यवंशीने टीम इंडियाचा डाव सावरला. वैभवने ३० चेंडूत अर्धशतक झळकावलं. यानंतर वैभवने ६७ चेंडूत ६ चौकार व ३ षटकारांसह ७२ धावा करत झेलबाद झाला. बुलावायोमधील ढगाळ वातावरणामुळे या खेळपट्टीवर फलंदाजी करणं फार अवघड झालं आहे.

वैभव सूर्यवंशीने मैदानात उतरताच एका खास क्रमवारीत विराट कोहलीला मागे टाकलं. यासह वैभवने युवा एकदिवसीय कारकिर्दीत १००० धावांचा टप्पाही ओलांडला. गेल्या वर्षभरात, वैभवने फलंदाजीने सातत्याने अनेक नवीन विक्रम मोडले आहेत. युवा एकदिवसीय सामन्यांमध्ये भारतासाठी सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत वैभव सूर्यवंशीने विराट कोहलीला मागे टाकलं आहे.

विराट कोहलीने त्याच्या युवा एकदिवसीय कारकिर्दीत, २८ सामन्यांच्या २५ डावांमध्ये फलंदाजी करत ४६.५७ च्या उत्कृष्ट सरासरीने एकूण ९७८ धावा केल्या. वैभवने २० डावांमध्ये ५० पेक्षा जास्त सरासरीने युवा एकदिवसीय सामन्यात १ हजार धावा पूर्ण केल्या आहेत, तर तो कोहलीच्याही पुढे गेला आहे. युवा एकदिवसीय सामन्यांमध्ये सर्वात कमी डावांमध्ये १ हजार धावांचा टप्पा गाठणारा वैभव हा तिसरा सर्वात जलद भारतीय खेळाडू ठरला.

सर्वात जलद १ हजार धावा करण्याच्या बाबतीत त्याच्यापुढे फक्त शुबमन गिलने हा टप्पा सर्वात जलद गाठला, त्याने १३ डावांत धावांचा हा टप्पा गाठला, तर उन्मुक्त चंदने १७ डावांत धावा केल्या. वैभव युवा एकदिवसीय सामन्यांमध्ये १ हजार धावा पूर्ण करणारा सातवा भारतीय खेळाडू ठरला.

युवा वनडेमध्ये भारतासाठी सर्वाधिक धावा करणारा खेळाडू

विजय झोल – १४०४ धावा
यशस्वी जैस्वाल – १३८६ धावा
तन्मय श्रीवास्तव – १३१६ धावा
उन्मुक्त चंद – ११४९ धावा
शुबमन गिल – ११४९ धावा
सर्फराझ खान – १०८० धावा
वैभव सूर्यवंशी – १०२६* धावा