Vaibhav Suryavanshi Touch Ashish Nehar’s Feet Video: वैभव सूर्यवंशी आज पुन्हा एकदा अॅक्शनमध्ये दिसणार आहे. शनिवार ४ एप्रिलच्या डबल हेडरमधील दुसरा सामना राजस्थान रॉयल्स आणि गुजरात टायटन्स संघांमध्ये होणार आहे. आयपीएल २०२६ ची सुरूवात वैभव सूर्यवंशीने एकदम दणक्यात केली आहे. राजस्थान रॉयल्ससाठीच्या आपल्या पहिल्याच सामन्यात, १५ वर्षीय वैभवने १६ चेंडूत अर्धशतक झळकावलं. यानंतर आता पुढील सामन्यापूर्वी वैभव सूर्यवंशी गुजरात टायटन्स संघाचा कोच आशिष नेहराच्या पाया पडतानाचा व्हीडिओ व्हायरल होत आहे.
आता, वैभव त्या संघाचा सामना करण्यास सज्ज आहे, ज्या संघाने त्याला गेल्या वर्षी जगभरात ओळख मिळवून दिली होती. वैभव सूर्यवंशीने आयपीएलमध्ये विक्रमी ३५ चेंडूत शतक झळकावलं होतं. याच संघाविरूद्ध आज शनिवारी राजस्थान रॉयल्सचा संघ भिडणार आहे. या सामन्यापूर्वी दोन्ही संघ मैदानावर सराव करत असतानाचा वैभव सूर्यवंशीचा व्हीडिओ सर्वांचं लक्ष वेधत आहे.
गुजरात-राजस्थान सामन्याच्या एक दिवस आधी दोन्ही संघ सरावाला उतरले असतानाचा व्हीडिओ समोर आला आहे. अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर दोन्ही संघ एकत्र सराव करत होते. सामन्यादरम्यान वैभव सूर्यवंशीदेखील मैदानावर होता. गुजरात टायटन्सचे प्रशिक्षक आशिष नेहरा यांच्या नजरेस हा तरुण फलंदाज पडताच वैभव त्याची भेट घेण्यासाठी पुढे गेला. नेहराला जवळ येताना पाहून वैभव थेट त्याच्याजवळ गेला आणि त्याने त्याच्या पायांना स्पर्श कjत आशीर्वाद घेतला. यानंतर आशिष नेहराने देखील थांबवलं आणि त्याचं कौतुक करत त्याला स्पर्धेसाठी शुभेच्छा देत असल्याच्या त्याच्या हावभावावरून दिसून आलं.
वैभव सूर्यवंशीचे वयापेक्षाही संस्कार मोठे
१५ वर्षीय वैभव सूर्यवंशीचं या कृतीनंतर कौतुक होत आहे. वय कमी असलं तरी त्याच्यावरील संस्कारांचं कौतुक चाहत्यांकडून केलं जात आहे. वैभव सूर्यवंशी अनेक अनुभवी व दिग्गज खेळाडूंना आयपीएलदरम्यान भेटत आहे आणि अगदी नम्रपणे त्यांच्याशी चर्चा करताना बोलताना दिसत आहे. जोस बटलरसह चर्चा करतानाचा व्हीडिओदेखील व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये त्याचा खेळ पाहून बटलर त्याला १५ वर्षांचा नव्हे तर २१ वर्षांचा आहेस असं म्हणत कौतुक करत आहे. तर २०२५ मध्ये वैभव सूर्यवंशी धोनीच्या पाया पडतानाही दिसला होता.
गेल्या हंगामात, वैभवने आपल्या पदार्पणाच्या सामन्यातील पहिल्याच चेंडूवर षटकार मारून सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं, पण आपल्या ऐतिहासिक शतकाने तो जगभरात प्रसिद्ध झाला. अवघ्या १४ वर्षांचा असताना वैभवने आशिष नेहराच्या गुजरात संघाविरुद्ध केवळ ३५ चेंडूंमध्ये शतक झळकावलं. वैभवचं शतक हे आयपीएलमधील कोणत्याही भारतीय फलंदाजाने केलेलं सर्वात जलद शतक आणि आयपीएलच्या इतिहासातील दुसरं सर्वात जलद शतक होतं.
