Vaibhav Suryavanshi touches Jay Shah feet video viral Asian Games: भारताच्या पुरूष क्रिकेट संघाने आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ मध्ये सुवर्णपदक पटकावलं आहे. अंतिम सामन्यात भारताने पाकिस्तानचा १९ धावांनी पराभव केला. यासह भारताच्या महिला संघानंतर पुरूष संघानेही सुवर्ण कामगिरी केली आहे. भारताच्या या विजयानंतर आयसीसीचे अध्यक्ष जय शाह यांनी भारतीय खेळाडूंचं कौतुक केलं आणि सुवर्णपदकं देखील संघाला दिली. यादरम्यानचा वैभव सूर्यवंशीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.
भारताने प्रथम फलंदाजी करताना अभिषेक शर्मा व तिलक वर्मा यांच्या अर्धशतकी खेळीच्या बळावर २१२ धावांचा डोंगर उभारला. पाकिस्तान संघासमोर विजयासाठी २१२ धावांचे लक्ष्य होतं, परंतु त्यांना सहा गडी गमावून केवळ १९२ धावाच करता आल्या. भारताच्या गोलंदाजांनी व संपूर्ण संघांतील खेळाडूंच्या फिल्डिंगच्या बळावर भारताने विजयी कामगिरी केली.
सामन्यानंतरच्या जल्लोषादरम्यान एका विशेष प्रसंगाने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे (ICC) अध्यक्ष जय शाह भारतीय खेळाडूंचे विजयाबद्दल अभिनंदन करण्यासाठी मैदानावर पोहोचले, तेव्हा १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीने वाकून त्यांचे चरणस्पर्श केले आणि आशीर्वाद घेतले. वैभवच्या या कृतीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर चर्चेत आहे. वैभव पाया पडायला वाकल्यानंतर जय शाह लगेच मागे झाले आणि त्यांनी वैभवचा हात पायांना स्पर्श करण्यापूर्वी अडवला. त्यानंतर जय शाह यांनी त्याच्या पाठीवर थाप देत त्याचं कौतुक केलं.
वैभव सूर्यवंशीच्या संस्कारांचं चाहते कौतुक करत आहे. वैभव अनेकदा दिग्गज खेळाडू व मोठ्या व्यक्तींच्या पाया पडताना दिसला आहे. त्याच्या वडिलांनी त्याला ही सवय लावल्याचं त्याने आयपीएलदरम्यानच्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे.
‘बॉस बेबी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वैभव सूर्यवंशीने अंतिम सामन्यात ९ चेंडूंत १५ धावा केल्या, ज्यामध्ये दोन षटकारांचा समावेश होता. त्याने मोठी खेळी केली नसली, तरी त्याने एक महत्त्वपूर्ण विक्रम आपल्या नावे केला. आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारा वैभव सूर्यवंशी हा आतापर्यंतचा सर्वात तरुण भारतीय खेळाडू ठरला आहे.
१५ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अनेक मोठे विक्रम आपल्या नावे केले आहेत. आयपीएलमधील उत्कृष्ट कामगिरीच्या बळावर त्याने आपली ओळख तयार केली आहे. आयपीएल २०२६ मध्ये राजस्थान रॉयल्ससाठी जबरदस्त कामगिरी केल्यानंतर त्याने भारतीय संघात स्थान मिळवल आणि आता आशियाई क्रीडा स्पर्धेत संघासह सुवर्णपदक जिंकलं आहे. पाकिस्तानविरुद्धच्या अंतिम सामन्यानंतर जय शाह यांच्याशी झालेल्या भेटीदरम्यानचा वैभवचा हा क्षण कॅमेऱ्यात कैद झाला असून, त्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतलं आहे.
