Vaibav Suryavanshi World Record With SMAT Hundred: वैभव सूर्यवंशीने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी २०२५ मध्ये महाराष्ट्राविरुद्ध शतक झळकावले. त्याने फक्त ५८ चेंडूत तिसरं टी२० शतक केलं. वैभवने ६१ चेंडूत सात षटकार आणि सात चौकार मारत १०८ धावा करत नाबाद राहिला. त्याच्या खेळीमुळे बिहारने पृथ्वी शॉच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र संघाविरुद्ध तीन बाद १७६ धावा केल्या. वैभव सूर्यवंशीने या खेळीसाठी मोठा विश्वविक्रम आपल्या नावे केला आहे.
वैभव सूर्यवंशीने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी २०२५ मध्ये महाराष्ट्राविरुद्ध शानदार शतक झळकावले. हंगामातील पहिल्या तीन सामन्यांमध्ये वैभव अपयशी ठरला. पण चौथ्या सामन्यात त्याने कोणतीही चूक केली नाही आणि थेट शतक झळकावलं. वैभवचे हे स्पर्धेतील पहिलं आणि टी-२० क्रिकेटमधील तिसरं शतक आहे.
पृथ्वी शॉच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्राविरुद्ध वैभवने शानदार खेळी केली आणि या संघाच्या गोलंदाजांची शाळा घेतली, त्याने ५८ चेंडूत आपले शतक पूर्ण केलं. वैभवने ३४ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केलं. तर १७७.०५ च्या स्ट्राईक रेटने ६१ चेंडूत सात षटकार आणि सात चौकारांसह नाबाद १०८ धावांची खेळी साकारली.
वैभव सूर्यवंशीचा World Record
वैभव सूर्यवंशी हा टी-२० कारकिर्दीत तीन टी-२० शतकं झळकावणारा जगातील पहिला युवा खेळाडू ठरला. सध्या सुरू असलेल्या सय्यद मुश्ताक अली स्पर्धेत सलग दोन शतकं झळकावणारा त्याचा अंडर-१९ संघातील सहकारी आयुष म्हात्रे आणि फ्रान्सचा गुस्ताव मॅकेऑन हेदेखील सर्वाधिक शतक करणाऱ्या युवा खेळाडूंच्या यादीत वैभवच्या मागे आहेत.
सर्वाधिक टी-२० शतकं करणारे युवा खेळाडू
३* – वैभव सूर्यवंशी (१६ डाव)
२ – गुस्ताव मॅकेऑन (११ डाव)
२ – आयुष म्हात्रे (१० डाव)
वैभव सूर्यवंशीने त्याच्या कारकिर्दीत १६ डावांत तिन्ही शतकं वेगवेगळ्या संघासाठी झळकावली आहेत. या वर्षाच्या सुरुवातीला आयपीएल २०२५ मध्ये गुजरात टायटन्सविरुद्ध राजस्थान रॉयल्सकडून ३५ चेंडूत त्याने धमाकेदार शतक झळकावलं आणि लीगच्या इतिहासातील सर्वात जलद शतक झळकावणारा भारतीय फलंदाज ठरला.
गेल्या महिन्यात, कतारमध्ये झालेल्या रायझिंग स्टार्स आशिया कप दरम्यान सूर्यवंशीने भारत अ संघासाठी पदार्पण केलं. सूर्यवंशीने दोहा येथे झालेल्या स्पर्धेत युएईविरुद्ध भारत अ संघाकडून ३२ चेंडूत वादळी शतक झळकावलं. १४ वर्षीय फलंदाज ३५ चेंडू किंवा त्यापेक्षा कमी चेंडूंमध्ये दोन टी-२० शतकं करणारा एकमेव खेळाडू ठरला होता.
