Vaibhav Suryavanshi Yashasvi Jaiswal Record: आयपीएल २०२६ मध्ये पहिल्याच डबल हेडरमधील दुसरा सामना राजस्थान रॉयल्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात खेळवला जात आहे. या सामन्यापूर्वीच वैभव सूर्यवंशीच्या खेळीची चर्चा सुरू होती. पण या सामन्यात वैभव सूर्यवंशी व यशस्वी जैस्वालच्या जोडीने मोठा इतिहास घडवला आहे. १८ वर्षांच्या आयपीएल इतिहासात कोणत्या जोडीला जमलं नाही ते या दोन्ही तरूण फलंदाजांनी करून दाखवलं आहे.

राजस्थान रॉयल्सच्या सलामीवीरांनी गुजरातविरूद्ध सामन्यात वादळी सुरूवात केली. चेन्नई सुपर किंग्जविरुद्धच्या सामन्यात वैभवने ५२ धावा आणि जैस्वालने ३८ धावा करत आपल्या मोहिमेची दमदार सुरुवात केली होती, आणि टायटन्सविरुद्धही त्यांनी तोच फॉर्म कायम ठेवला. या जोडीने अवघ्या २६ चेंडूत ५० धावांची आक्रमक भागीदारी करत राजस्थानला मजबूत स्थितीत पोहोचवले. यासोबतच, या जोडीने आयपीएलमध्ये एकत्रित ५०० धावांचा मोठा टप्पाही गाठला

वैभव-यशस्वी १८ वर्षांच्या IPL इतिहासात अशी कामगिरी करणारी पहिलीच जोडी

राजस्थान आणि गुजरात यांच्यातील सामन्यात वैभव सूर्यवंशीने मोहम्मद सिराजच्या पहिल्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर चौकार मारून स्वत:चं आणि यशस्वी जैस्वालचं नाव इतिहासाच्या सुवर्ण पानांवर कोरलं. या चौकारासह, वैभव आणि जैस्वाल ही जोडी आयपीएलच्या १८ वर्षांच्या इतिहासात सर्वात जलद ५०० धावा करणारी पहिली जोडी ठरली. यापूर्वी, आयपीएलच्या पहिल्याच वर्षी, २००८ मध्ये, दिल्ली डेअरडेव्हिल्स (आता दिल्ली कॅपिटल्स) संघाकडून खेळताना वीरेंद्र सेहवाग आणि गौतम गंभीर यांनी हा पराक्रम केला होता.

सूर्यवंशीने सिराजच्या दुसऱ्याच चेंडूवर चौकार मारून, आयपीएलच्या इतिहासात सर्वात जलद ५०० धावा पूर्ण करणारे सलामीवीर म्हणून विक्रम नावे केला. या सामन्यापूर्वी जैस्वाल व सूर्यवंशीने २४६ चेंडूंमध्ये ४९७ धावा केल्या होत्या. त्यांनी अवघ्या दोन चेंडूंमध्ये ५०० धावांचा टप्पा गाठला आणि २४८ चेंडूंमध्ये हा पराक्रम केला.

यासोबतच, त्याने सेहवाग आणि गौतम गंभीर यांचा एकत्र सर्वात जलद ५०० धावा करण्याचा आधीचा विक्रम मोडीत काढला. आयपीएलच्या इतिहासात किमान ५०० धावा करणाऱ्या ११३ जोड्यांमध्ये या जोडीचा स्ट्राइक रेट १२.०२ हा अतिशय प्रभावी आहे. फक्त ट्रॅव्हिस हेड–अभिषेक शर्मा (१२.५७) आणि फिल सॉल्ट–सुनिल नारायण (१२.४६) या जोड्यांनी यापेक्षा जलद गतीने धावा केल्या आहेत.

वैभव सूर्यवंशीने आपल्या शानदार फटक्यांनी सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. गेल्या वर्षी राजस्थानकडून खेळण्याची संधी मिळाल्यापासून तो जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. आयपीएलमध्ये शतक झळकावणारा सर्वात तरुण खेळाडू बनत त्याने लगेचच आपली छाप पाडली. त्यानंतर त्याने अंडर-१९ दौऱ्यांमध्ये ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिकेतही शतकं झळकावली आणि हंगामाचा शेवट त्याने अंडर-१९ विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात १७५ धावांच्या अफलातून खेळीने केला. यानंतर आता आयपीएलमधील चांगल्या सुरूवातीनंतर वैभवला लवकरात लवकर भारताच्या वरिष्ठ संघात संधी देण्याची चर्चा सुरू आहे.