Vaibhav Suryavanshi Asian Games gold medalist India vs Pakistan 2026: आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ मध्ये भारताच्या पुरूष क्रिकेट संघाने सुवर्णपदक पटकावलं आहे. भारताने हाय स्कोरिंग सामन्यात पाकिस्तान संघाचा १९ धावांनी पराभव करत सुवर्णपदक आपल्या नावे केलं. भारताच्या या गोल्डन टीममध्ये भारताचा वैभव सूर्यवंशीदेखील होता. वैभवने हे सुवर्णपदक जिंकताच मोठा विक्रम आपल्या नावे केला आहे. भारताच्या आजवर कोणत्याच अॅथलीटने अशी कामगिरी केली नव्हती, जी वैभव सूर्यवंशीने करून दाखवली.
भारतीय क्रिकेटमधील उदयोन्मुख स्टार वैभव सूर्यवंशी याने अत्यंत तरुण वयात आणखी एक ऐतिहासिक विक्रम आपल्या नावे केला आहे; ही कामगिरी केवळ क्रिकेटपुरती मर्यादित न राहता भारतीय क्रीडा इतिहासाच्या पानांवरही सुवर्णअक्षरांनी कोरली गेली आहे. २०२६ च्या आशियाई क्रीडा स्पर्धेतील पुरुषांच्या क्रिकेट अंतिम सामन्यात भारताने पाकिस्तानचा पराभव करून सुवर्णपदक जिंकलं. या कामगिरीसह, आशियाई क्रीडा स्पर्धेच्या इतिहासात सुवर्णपदक जिंकणारा वैभव हा सर्वात तरुण भारतीय खेळाडू ठरला आहे.
केवळ १५ वर्षे, ६ महिने आणि १० दिवस वय असताना विजेत्यांच्या मंचावर स्थान मिळवत, वैभव सूर्यवंशीने स्टार नेमबाज सौरभ चौधरीचा आठ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडीत काढला आहे. यापूर्वी हा रेकॉर्ड विक्रम चौधरीच्या नावावर होता; त्याने वयाच्या १६ व्या वर्षी २०१८ च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत १० मीटर एअर पिस्तूल प्रकारात सुवर्णपदक जिंकलं होतं.
वैभव सूर्यवंशी हा आशियाई क्रीडा स्पर्धेतील भारताचा दुसरा सर्वात तरुण पदक विजेता आहे. हा विक्रम स्पीड स्केटर संजना बाथुला यांच्या नावावर आहे, ज्यांनी २०२३ मध्ये हांगझू येथे झालेल्या महिलांच्या स्पीड स्केटिंग ३००० मीटर रिलेमध्ये १५ वर्षे, ३ महिने आणि ११ दिवस वय असताना कांस्यपदक जिंकलं होतं.
पाकिस्तानविरुद्धच्या अंतिम सामन्यात वैभव सूर्यवंशीकडून एका मोठ्या खेळीची अपेक्षा होती, परंतु अंतिम सामन्यात त्याला अपेक्षेप्रमाणे चमक दाखवता आली नाही. डावाच्या सुरुवातीला त्याने आक्रमक पवित्रा घेत ९ चेंडूंत १५ धावा केल्या, मात्र पाकिस्तानचा अष्टपैलू खेळाडू सैम अयूबने तिसऱ्या षटकात त्याला बाद करून पॅव्हेलियनमध्ये परत पाठवलं. अयुबने वैभवला बाद केल्यानंतर केलेल्या बेबी सेलिब्रेशनने सर्वांचं लक्ष वेधलं, पण भारतीय संघाने सुवर्णपदक जिंकत चांगलंच प्रत्युत्तर दिलं.
