पाफोस : ‘कँडिडेट्स’ बुद्धिबळ स्पर्धेच्या नवव्या फेरीत महिला विभागात दोन भारतीय ग्रँडमास्टरमध्ये झालेल्या लढतीत आर. वैशालीने विश्वचषक विजेत्या दिव्या देशमुखला पराभूत करण्याची किमया साधली. त्याच वेळी झू जिनेरने कॅटरिना लायनोवर मात केली. त्यामुळे आता वैशाली आणि जिनेर समान ५.५ गुणांसह संयुक्तपणे आघाडीवर आहेत.
खुल्या विभागात आघाडीवर असणार्या जावोखिर सिंदारोवने पुन्हा एकदा बरोबरीवर समाधान मानताना जर्मनीच्या माथियास ब्लुबाऊमविरुद्ध गुण विभागून घेतला. भारताच्या आर. प्रज्ञानंदला चांगल्या सुरुवातीनंतरही चीनच्या वे यीविरुद्ध केवळ बरोबरीच साधता आली.
दिव्याच्या चुकीच्या निर्णयाचा वैशालीने फायदा घेतला. दिव्याने धोका पत्करला आणि पटाच्या मध्यभागावरील नियंत्रण तिने गमावले. त्यानंतर पांढर्या मोहर्यांनी खेळणार्या वैशालीला तिचा वजीर आणि हत्ती सक्रिय करता आला. वैशालीने सातत्याने अचूक चाली रचत दिव्यावर दडपण आणले. अखेर वेळेचे गणित साधणे दिव्याला अवघड गेले आणि वैशालीने ३१ चालींत विजयाची नोंद केली.
टॅन झोंगयी आणि ॲना मुझिचुक, तसेच ॲलेक्सांड्रा गोर्याचकिना आणि बिबिसारा असाऊबायेवा यांच्यातील लढत बरोबरीत संपली. खुल्या विभागात, नेदरलँड्सच्या अनिश गिरीने अमेरिकेच्या फॅबियानो कारुआनाला पराभवाचा धक्का दिला. या निकालामुळे गिरी ४.५ गुणांसह दुसर्या स्थानी पोहोचला, तर कारुआनाची ४.५ गुणांसह तिसर्या स्थानी घसरण झाली. सिंदारोव सात गुणांसह आघाडीवर आहे. प्रज्ञानंदला बरोबरीवर समाधान मानावे लागले. त्यामुळे चार गुणांसह तो संयुक्त चौथ्या स्थानावर आहे.
