सायप्रस बेटावर जागतिक विजेतेपदासाठी आव्हानवीर ठरवण्याकरिता सुरू असलेल्या ‘कँडिडेट्स’ बुद्धिबळ स्पर्धेत खुल्या आणि महिला विभागात अनुक्रमे उझबेकिस्तानचा ग्रँडमास्टर जावोखिर सिंदारोव आणि भारताची ग्रँडमास्टर रमेशबाबू वैशाली यांनी १० फेर्यांनंतर आघाडी घेतली आहे. सिंदारोवने प्रतिस्पर्धांवर तब्बल दोन गुणांची आघाडी घेतली आहे, तर वैशाली अवघ्या अध्र्या गुणाने चीनच्या झू जिनेर आणि युक्रेनच्या ॲना मुझिचुक यांच्या पुढे आहे. त्यामुळे दर्जेदार खेळ सुरू ठेवत ही आघाडी टिकवण्याचेच आता वैशालीसमोर आव्हान असेल.
भारताचे आशास्थान असलेल्या प्रज्ञानंद आणि दिव्या देशमुख यांचे दहाव्या फेरीतील पराभव त्यांच्या आशांवर पाणी फेरणारे ठरले. तरीही महिला विभागात इतकी चुरस आहे की सलग दोन पराभवानंतरही गुणतालिकेत सातव्या क्रमांकावर असलेल्या दिव्याच्या आशा अजूनही कायम आहेत. मात्र, तिने आपली पराभवाची मालिका खंडित करणे गरजेचे आहे. नागपूरची ही विश्वचषक विजेती ते करण्याची क्षमता निश्चितच बाळगते.
सिंदारोवच्या विजयामागील गणित वेगळेच आहे. सामान्यत: खेळाडू स्पर्धेदरम्यान अनुभवी साहाय्यकांची टीम ठेवतात. मात्र, २० वर्षीय सिंदारोवचे मदतनीस त्याच्याहून लहान असलेले, ग्रँडमास्टर मुखिद्दीन मादामिनोव्ह आणि त्याचा धाकटा भाऊ इसलोमबेक सिंदारोव आहेत. प्रज्ञानंदविरुद्ध नवव्या चालीत चूक केल्यानंतर त्याला विजयासाठी कठोर संघर्ष करावा लागला. ‘‘परत गेल्यावर माझ्या प्रशिक्षकांकडून माझी चांगलीच धुलाई होणार,’’ असे तो डाव संपल्यानंतर म्हणाला.
वैशालीची २०२४च्या ‘कँडिडेट्स’ स्पर्धेतील कामगिरी पाहता ती आता अधिक प्रगल्भ झाल्याचे जाणवते. त्या वेळी पहिले चार डाव गमावल्यानंतर तिने सलग पाच विजय मिळवले होते. मात्र, यावेळी ती परिस्थितीनुसार खेळताना दिसत आहे. दिव्याविरुद्ध आक्रमक खेळणारी वैशाली मुझिचुकविरुद्ध मात्र संयम राखून खेळली. वैशालीला गाठण्यासाठी अनावश्यक धोके पत्करणार्या झू जिनेरला बिबिसाराने पराभूत केले. दोघींमधील गेले पाच डाव बिबिसाराने जिंकले आहेत, त्यामुळे झूचा हा निर्णय आत्मघातकी ठरला असे म्हणावे लागेल.
सिंदारोव स्वत:च्या चुका मान्य करत असताना स्पर्धेतील अव्वल मानांकित हिकारू नाकामुरा मात्र आपल्या प्रशिक्षकांवर दोष टाकताना दिसला. नवव्या फेरीत पहिला विजय मिळवल्यानंतर त्याने प्रक्षोभक प्रतिक्रिया दिली. ‘‘मला बुद्धिबळ खेळता येत नाही असे मानणार्यांसाठी हे उत्तर आहे,’’ असे तो म्हणाला.
प्रज्ञानंदकडे अधिक मोहरे असूनही तो चूक करून पराभूत होत असल्याचे पाहून सिंदारोवचा पाठलाग करणार्या अनिश गिरीच्या चेहर्यावर निराशा दिसत होती. अनिशची विनोदबुद्धी नेहमीच लक्ष वेधून घेते. त्याने याआधीच्या फेरीत सलग दोन विजय मिळवल्यानंतर पत्रकार परिषदेत ‘‘मी छोटा सिंदारोव्ह झालो आहे,’’ असे म्हणत हशा पिकवला होता.
सध्या अध्र्या गुणाने आघाडीवर असलेल्या वैशालीचा पुढील मार्ग सोपा नाही. दिव्याला हरवून स्पर्धेतील पहिला विजय मिळवलेल्या रशियाच्या अलेक्सांड्रा गोर्याचकिना हिच्यानंतर झू जिनेर आणि टॅन झोंगयी या चिनी खेळाडूंचे आव्हान तिच्यासमोर असेल. मात्र, आत्मविश्वास मिळालेल्या वैशालीला आता भारतीय क्रीडाप्रेमींचा पूर्ण पाठिंबा असेल,
हे निश्चित. द्रोणाचार्य पुरस्कार विजेते बुद्धिबळ प्रशिक्षक
