गॅरी नेव्हील यांना व्हेलेंसियाचे प्रशिक्षक म्हणून ‘ला लिगा’ स्पध्रेतील पहिल्या विजयासाठी प्रतीक्षा पाहावी लागणार आहे. रविवारी झालेल्या सामन्यात व्हेलेंसियाला गेटाफेविरुद्ध २-२ अशा बरोबरीवर समाधान मानावे लागले. विशेष म्हणजे हे चारही गोल पहिल्या ३५ मिनिटांत झाले. दुसऱ्या सत्रात दोन्ही संघांना गोल करण्यात अपयश आले.

पॅब्लो सॅरेबियाने १०व्या मिनिटाला गेटाफेसाठी गोल नोंदवला. मात्र, अवघ्या १५ मिनिटांत पॅको अ‍ॅलसेसरने प्रत्युत्तर देत सामना १-१ असा बरोबरीत आणला. २२व्या मिनिटाला लफिताच्या गोलने गेटाफेला २-१ अशी आघाडी मिळवून दिली. व्हेलेंसिया पराभवाच्या छायेत दिसत असताना ३५व्या मिनिटाला सँटी मिनाने गोल केला. या गोलने मध्यंतराला सामना २-२ असा बरोबरीत आला. दुसऱ्या सत्रात दोन्ही संघांनी चिवट खेळ करून सामना बरोबरीत सोडवण्यात यश मिळवले. या बरोबरीमुळे व्हेलेंसिया २२ गुणांसह आठव्या, तर १६ गुणांसह गेटाफे १४व्या स्थानावर आहे