डाव्या पायाच्या दुखापतीमुळे होणार्या वेदना सहन करत खेळणारा फिरकीपटू वरुण चक्रवर्ती याचे कोलकाता नाइट रायडर्स संघाचा साहाय्यक प्रशिक्षक शेन वॉटसनने विशेष कौतुक केले. कोलकाता संघाला ‘प्ले-ऑफ’मध्ये पोहोचवण्यासाठी तो प्रचंड जिद्दीने खेळत असून त्याची तळमळ प्रेरणादायी असल्याचे वॉटसन म्हणाला.
दोन आठवड्यांपूर्वी दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या ‘आयपीएल’ सामन्यात क्षेत्ररक्षण करताना वरुणच्या डाव्या पायाला दुखापत झाली. त्यानंतर तो रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुविरुद्धचा सामना खेळू शकला नव्हता. मुख्य प्रशिक्षक अभिषेक नायर यांनी त्याला ‘हेअरलाइन फ्रॅक्चर’ झाल्याची माहिती दिली होती. मात्र, ‘प्ले-ऑफ’च्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी कोलकाता संघाला विजय आवश्यक असताना वरुणने मैदानावर पुनरागमन केले आणि तो गुजरात टायटन्स व मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात खेळला.
‘‘दुखापतीनंतर वरुणच्या पुनर्वसनाची (रिहॅब) नेमकी स्थिती मला माहिती नाही. मात्र, तो वेदना सहन करत खेळत आहे हे मी जाणतो. हेच त्याच्या धाडसाचे आणि कोलकाता संघासाठी योगदान देण्याच्या इच्छेचे प्रतीक आहे. जायबंदी असूनही तो अप्रतिम गोलंदाजी करत आहे,’’ असे वॉटसन म्हणाला. मुंबईिवरुद्ध बुधवारी झालेल्या सामन्यात कोलकाताने चार गडी राखून विजय मिळवला. त्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना वॉटसनने वरुणचे कौतुक केले.
‘आयपीएल’च्या पहिल्या तीन सामन्यांत वरुणला एकही बळी मिळवता आला नाही आणि त्याने १०५ धावा खर्ची केल्या होत्या. मात्र, निर्णायक टप्प्यात त्याने कामगिरी उंचावली आणि चार सामन्यांत १० बळी घेत कोलकाता संघाच्या पुनरागमनात मोठी भूमिका बजावली. ‘‘सुरुवातीच्या निराशाजनक कामगिरीनंतर त्याने ज्या पद्धतीने पुनरागमन केले, ते पाहणे खूप आनंद देणारे आहे.
वरुणसारखा कौशल्यवान, संघासाठी झटणारा खेळाडू आमच्याकडे आहे, हे आमचे भाग्यच,’’ असे वॉटसन म्हणाला. यंदाच्या ‘आयपीएल’ हंगामाच्या सुरुवातीच्या सहा सामन्यांत कोलकाताला एकही विजय मिळवता आला नव्हता. परंतु त्यानंतर कोलकाताने सातपैकी सहा सामने जिंकले आहेत. त्यामुळे दिल्लीविरुद्ध अखेरच्या सामन्यापूर्वी त्यांची ‘प्ले-ऑफ’ची आशा कायम आहे.
‘बीसीसीआय’चा हस्तक्षेप नाही
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) वरुणच्या दुखापतीची दखल घेतली आहे. मात्र, ‘आयपीएल’ सुरू असल्याने आम्हाला जास्त हस्तक्षेप करता येणार नसल्याचे सचिव देवजित सैकिया यांनी स्पष्ट केले. खेळाडूंची काळजी घेणे ही ‘आयपीएल’ संघांची जबाबदारी असल्याचे त्यांनी सांगितले. भारताचा संघ २६ जूनपासून आयर्लंड आणि इंग्लंड दौर्यावर जाणार असून त्यात सात ट्वेन्टी-२० सामने खेळणार आहे.
रघुवंशीलाही दुखापत
मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात तिलक वर्माचा झेल घेण्याच्या प्रयत्नात वरुण चक्रवर्ती आणि यष्टिरक्षक-फलंदाज अंगक्रिश रघुवंशी यांची जोरदार धडक झाली. यानंतर रघुवंशीला चक्कर आली. त्यामुळे तो मैदानाबाहेर गेला आणि फलंदाजीसाठीही उतरला नाही. ‘‘रघुवंशी झेल घेण्यासाठी खूप जोरात धावत आला. वरुणशी झालेल्या धडकेमुळे त्याला मानदुखी, चक्कर आणि डोकेदुखीचा त्रास झाला. ‘कन्कशन’मुळेच त्याला फलंदाजीसाठी पाठविण्यात आले नाही,’’ असे वॉटसनने स्पष्ट केले. वरुण सहजपणे विश्रांती घेण्याचा निर्णय घेऊ शकला असता. मात्र, तो संघासाठी सर्वस्व पणाला लावत आहे. त्यामुळे आम्ही त्याचे खूप आभारी आहोत.
-शेन वॉटसन
आजचा सामना
हैदराबाद वि. बंगळूरु
’ वेळ : सायं. ७.३० वा.
थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १,
१ हिंदी, जिओहॉटस्टार ॲप
