टीम इंडियाचा फिरकीपटू वरुण चक्रवर्ती अफगाणिस्तानविरुद्धच्या मालिकेतील उर्वरित दोन सामने खेळू शकणार नाही. साईड स्ट्रेनच्या दुखापतीमुळे वरुण खेळू शकणार नाही. ही दुखापत गंभीर नसल्यामुळे वरुण आशियाई क्रीडा स्पर्धेत सहभागी होईल अशी आशा आहे.
दोन महिन्यांच्या कालावधीनंतर वरुणने रविवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन केलं. त्याच्या मांडीच्या स्नायूंना दुखापत झाली होती. बंगळुरूस्थित नॅशनल सेंटर ऑफ एक्सलन्स इथे रिहॅब प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर वरुणचा भारतीय संघात समावेश करण्यात आला. अफगाणिस्तानविरुद्धच्या पहिल्या टी२० लढतीत वरुणने ४ षटकात १६ धावा देत एक विकेट पटकावली. जुलै महिन्याच्या सुरुवातीला इंग्लंडविरुद्ध खेळताना वरुण दुखापतग्रस्त झाला होता. रिहॅब प्रक्रियेनंतर तो तामिळनाडू प्रीमिअर लीग स्पर्धेत सहभागी झाला होता.
वरुणच्या जागी पर्यायी खेळाडूची घोषणा करण्यात आलेली नाही. राखीव खेळाडूंमध्ये रवी बिश्नोई आणि वॉशिंग्टन सुंदर हे फिरकीपटू आहेत. झिम्बाब्वे दौऱ्यात बिश्नोई तिन्ही सामने खेळला. वरुण फिट नसल्यामुळे त्याला संधी मिळाली होती. त्याने ३ सामन्यात ३ विकेट्स घेतल्या होत्या.
वॉशिंग्टन सुंदरचा समावेश केल्यास टीम इंडियाची फलंदाजी आणखी बळकट होऊ शकते. वॉशिंग्टनही पायाला झालेल्या दुखापतीतून सावरत पुनरागमन करतो आहे. भारताच्या ताफ्यात अनुभवी अक्षर पटेलही आहे. त्याने पहिल्या सामन्यात २७ धावांच्या मोबदल्यात एक विकेट घेतली.
अफगाणिस्तानविरुद्धची दुसरी लढत मंगळवारी तर तिसरी गुरुवारी होणार आहे.
