Varun Chakrawarthy Clean Bowled Shai Hope: आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२६ स्पर्धा सध्या शेवटच्या टप्प्यात आहे. या स्पर्धेतील सेमी फायनलमध्ये जाणारे ३ संघ ठरले आहेत. तर चौथं स्थान मिळवण्यासाठी भारत आणि वेस्ट इंडिज या दोन्ही संघांमध्ये चुरशीची लढत सुरू आहे. हा सुपर ८ फेरीतील दोन्ही संघांचा शेवटचा सामना आहे. जो संघ हा सामना जिंकेल, तो संघ थेट सेमी फायनलमध्ये प्रवेश करणार आहे. या सामन्यातील पहिल्या डावात फलंदाजी करण्यासाठी आलेल्या वेस्ट इंडिजला चांगली सुरूवात मिळाली होती, पण वरूण चक्रवर्तीने भारतीय संघाला पहिलं यश मिळवून दिलं.

या निर्णायक सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कोलकाताच्या इडन गार्डन्सच्या मैदानावर सुरू असलेल्या सामन्यात वेस्ट इंडिजची सलामी जोडी मैदानात उतरली. सलामीला आलेल्या शे होप आणि रोस्टन चेस यांनी मिळून दमदार सुरूवात करून दिली. दोघांनी मिळून पहिल्या विकेटसाठी ६८ धावा जोडल्या. पण भारताचा मिस्ट्री गोलंदाज वरूण चक्रवर्तीने ही जोडी फोडली.

तर झाले असे की, वेस्ट इंडिजची फलंदाजी सुरू असताना भारतीय संघाकडून ९ वे षटक टाकण्यासाठी वरूण चक्रवर्ती गोलंदाजीला आला. या षटकातील पाचवा चेंडू वरूण गुगली टाकला. जो ऑफ स्टम्पच्या बाहेर टप्पा पडून वेगाने आत आला. शे होपने हा चेंडू कट करण्याचा प्रयत्न केला. पण हा चेंडू इतक्या वेगाने आत आला की, काही कळायच्या आत होप त्रिफळाचित झाला. यासह वेस्ट इंडिजला ६८ धावांवर पहिला मोठा धक्का बसला.

या सामन्यासाठी अशी आहे दोन्ही संघांची प्लेईंग ११:

भारताची वेस्ट इंडिजविरूद्ध प्लेईंग इलेव्हन:
संजू सॅमसन (यष्टीरक्षक), अभिषेक शर्मा, इशान किशन, सूर्यकुमार यादव (कर्णधार), हार्दिक पांड्या, तिलक वर्मा, शिवम दुबे, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह

वेस्ट इंडिजची प्लेईंग इलेव्हन:
शाई होप (यष्टीरक्षक/कर्णधार), रोस्टन चेस, शिमरॉन हेटमायर, रोव्हमन पॉवेल, शेरफेन रदरफोर्ड, रोमॅरियो शेफर्ड, जेसन होल्डर, मॅथ्यू फोर्ड, अकिल हुसेन, गुडाकेश मोती, शामर जोसेफ