scorecardresearch

दिलीप दोशी यांची चिकाटी व कठोर मेहनत अनुकरणीय -वेंगसरकर

अंतिम फेरीत शिवाई क्रिकेट अकादमीच्या संघाने संजीवनी क्रिकेट अकादमीवर केवळ ५ धावांनी विजय मिळवत या स्पर्धेचे जेतेपद पटकावले

दिलीप दोशी यांची चिकाटी व कठोर मेहनत अनुकरणीय -वेंगसरकर
दिलीप वेंगसरकर फाऊंडेशनतर्फे १६ वर्षांखालील मुलांसाठी चर्चगेट येथील ओव्हल मैदानावर आयोजित केलेल्या स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभात दिलीप दोशी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

मुंबई : भारताचे माजी फिरकीपटू दिलीप दोशी यांची चिकाटी आणि कठोर मेहनत घेण्याची वृत्ती ही खरोखरच अनुकरणीय असल्याचे भारताचे माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर यांनी म्हटले आहे. दिलीप वेंगसरकर फाऊंडेशनतर्फे १६ वर्षांखालील मुलांसाठी चर्चगेट येथील ओव्हल मैदानावर आयोजित केलेल्या स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभात दिलीप दोशी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

‘‘दोशी यांना वयाच्या ३२व्या वर्षी आपला पहिला कसोटी सामना खेळण्याची संधी मिळाली. मात्र, त्यानंतर सलग चार वर्षे खेळत त्यांनी १०० पेक्षा अधिक बळी मिळवले होते. बंगाल आणि पूर्व विभागासाठी त्यांनी सातत्यपूर्ण कामगिरी करूनही त्यांना फार उशिराने संधी मिळाली. त्यांची चिकाटी आणि त्यांनी घेतलेली मेहनत कौतुकास्पद होती. त्यांच्याकडून खूप शिकण्यासारखे आहे. तुम्हीही निवड होत नाही म्हणून निराश होण्याची गरज नाही. मेहनत घेत राहिल्यास कधी ना कधी तुम्हाला संधी मिळणार हे लक्षात ठेवा,’’ असा सल्ला वेंगसरकर यांनी युवा खेळाडूंना दिला.

अंतिम फेरीत शिवाई क्रिकेट अकादमीच्या संघाने संजीवनी क्रिकेट अकादमीवर केवळ ५ धावांनी विजय मिळवत या स्पर्धेचे जेतेपद पटकावले. प्रथम फलंदाजी करताना शिवाई संघाचा डाव ३४.५ षटकांत १८८ धावांत आटोपला. यश गनिगा (६०) आणि प्रीतीश चाटवानी (५४) यांनी चौथ्या गडय़ासाठी ११४ धावांची भागीदारी केली. संजीवनीच्या दर्श सिंग (४/३२) आणि हर्ष आघाव (३/२६) यांनी प्रभावी गोलंदाजी केली. आव्हानाचा पाठलाग करताना संजीवनी संघाचा सलामीवीर वरद साखरकरे एकाकी झुंज दिली. त्याने ५४ चेंडूत दोन चौकार आणि पाच षटकारांच्या साहाय्याने ६७ धावा केल्या. हेमंत गौडाने त्याला स्वत:च्याच गोलंदाजीवर झेलबाद करून शिवाई संघाचा विजय जवळपास निश्चित केला.

गौडाने (३/३५), अमर्त्य राजे (३/३८) आणि कर्णधार संस्कार दहेलकर (२/३४) यांनी गोलंदाजीत चमक दाखवली.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 02-01-2023 at 02:46 IST

संबंधित बातम्या