Venkatesh Iyer Thalapathy Celebration Video: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि पंजाब किंग्स यांच्यातील सामन्यात वेंकटेश अय्यरने शानदार अर्धशतकी खेळी केली. पंजाब किंग्जविरुद्ध धरमशालामधील सामन्यात अर्धशतक करत त्याने संघाला २०० अधिक धावांचा पल्ला गाठून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. रजत पाटीदारच्या अनुपस्थितीत चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या वेंकटेशने अवघ्या ४० चेंडूत नाबाद ७३ धावांची तुफानी खेळी करत आरसीबीला २२२ धावांपर्यंत मजल मारून दिली.

पंजाबने नाणेफेक जिंकत आरसीबीला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केलं. आरसीबीने विराट कोहली व वेंकटेश अय्यर यांच्या अर्धशतकी खेळींच्या बळावर २२२ धावांचा पल्ला गाठला. तर देवदत्त पडिक्कलच्या ४५ धावा महत्त्वाच्या ठरल्या. शिवाय टीम डेव्हिडने २८ धावांची खेळी केली.लेंक

वेंकटेश अय्यकचं IPL 2026 मधील पहिल्या अर्धशतकाचं ‘थलपती विजय’ स्टाईलमध्ये सेलिब्रेशन

अर्धशतक पूर्ण केल्यानंतर वेंकटेशने भन्नाट सेलिब्रेशन करत चाहत्यांचं लक्ष वेधलं. त्याने दक्षिणात्य सुपरस्टार थलपती विजयच्या प्रसिद्ध ‘मर्सल’ पोझची नक्कल केली आणि हा क्षण लगेच सोशल मीडियावर व्हायरल झाला. आरसीबीसाठी प्लेऑफमधील स्थान निश्चित करणाऱ्या या खेळीत वेंकटेशने आक्रमक फलंदाजी करत संघाचा डाव सावरला आणि धावगतीही वाढवली. अर्धशतक पूर्ण होताच त्याने काही क्षण थांबत विजयच्या ‘मर्सल’ चित्रपटातील प्रसिद्ध स्टाइलिश पोझ दिली.

या पोझमध्ये विजय साधारणपणे एक हात चेहऱ्याच्या समोर किंवा वर तिरका ठेवून खास स्टाइलमध्ये उभा राहतो. चाहत्यांमध्ये प्रचंड लोकप्रिय असलेली ही स्टाईल आता वेंकटेश अय्यरनेही मैदानावर करत सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. देवदत्त पडिक्कल बाद झाल्यानंतर मैदानात आलेल्या वेंकटेशने सावध सुरूवात केली. अवघ्या ४० चेंडूत नाबाद ७३ धावांची स्फोटक खेळी करत त्याने पंजाबच्या गोलंदाजांची जोरदार धुलाई केली.

एका बाजूला विराट कोहलीने ५८ धावांची संयमी आणि प्रभावी खेळी करत डावाचा पाया रचला, तर दुसऱ्या बाजूला वेंकटेशने अखेरच्या षटकांमध्ये आक्रमक फलंदाजी करत धावगतीला चांगलाच वेग दिला. विशेषतः लॉकी फर्ग्युसनच्या गोलंदाजीवर त्याने अनेक षटकार खेचल्, तर वेगवान आणि फिरकी दोन्ही प्रकारच्या गोलंदाजांविरुद्ध सहजतेने फटकेबाजी केली.

टिम डेव्हिडच्या झटपट खेळीचीही त्याला चांगली साथ मिळाली. या दोघांच्या जोरावर आरसीबीने २२० धावांचा टप्पा पार करत प्लेऑफच्या शर्यतीतील आपली दावेदारी आणखी मजबूत केली.