India vs Pakistan Coctroversies: भारत पाकिस्तान सामने आणि वादविवाद यांचं नातं जुनं आहे. १९९६ वर्ल्डकपमधली बंगळुरू इथे झालेली लढत पाकिस्तानचा आमिर सोहेल आणि भारताचा वेंकटेश प्रसाद यांच्यातील जुगलबंदीने गाजली होती. भारत पाकिस्तान क्रिकेटमधल्या नाट्यमय घटनांपैकी ती एक आहे.
त्या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी स्वीकारली. नवज्योतसिंग सिद्धू आणि अजय जडेजा यांच्या .. खेळींच्या बळावर भारताने २८७ धावांची मजल मारली. त्याकाळी ही धावसंख्या दमदार मानली गेली. कारण तेव्हा अडीचशे पार धावसंख्या पोहोचणं हे मोठं लक्षण मानलं जात असे.
पाकिस्तानसाठी आमिर सोहेल आणि सईद अन्वर यांनी खणखणीत सलामी दिली. दोघांनाही सामना जिंकण्याच्या उद्देशाने फटकेबाजी सुरू केली. आमिर-सईद यांच्या आक्रमक इराद्यामुळे पाकिस्तानने १४.४ षटकात १०९ अशी भरारी घेतली होती. वेंकटेश प्रसादच्या षटकात आमिर सोहेलने ऑफसाईडला चौकार लगावला. त्यानंतर आमिरने प्रसादला उद्देशून बाऊंड्रीच्या दिशेने बॅट दाखवली. असा चेंडू टाकशील तर चौकार पिटाळेन असं सोहेलला सुचवायचं होतं.
शांत आणि मितभाषी स्वभावाच्या प्रसादने लगेच प्रत्युत्तर दिलं नाही. प्रसाद रनअपवर पोहोचला. प्रसादच्या पुढच्या चेंडूवर आमिर सोहेल त्रिफळाचीत झाला. आमिर बाद होताच मैदानात जल्लोषाची लाट उसळली. प्रसादला आवाजी पाठिंबा मिळाला तर सोहेलची हुर्यो उडवण्यात आली. चौकारानंतर सोहेलच्या उद्दाम वागण्याचा परिणाम प्रसादने आपल्या गोलंदाजीवर होऊ दिला नाही. गर्वाचे घर खाली या उक्तीने पुढच्याच चेंडूवर सोहेलने विकेट गमावली.
त्या प्रसंगाने सामन्याचं पारडं भारताच्या बाजूने फिरलं. पाकिस्तानला अतिशय उत्तम सलामी मिळाली होती. पाकिस्तानने त्यानंतर नियमित अंतरात विकेट्स गमावल्या आणि त्यांचा डाव २४८ धावांवरच आटोपला. ३९ धावांनी विजयासह भारताने दिमाखात सेमी फायनलमध्ये वाटचाल केली.
१९९६ मध्ये युट्यूब तसंच सोशल मीडिया काहीच नव्हतं. मात्र इंटरनेट आल्यानंतर ही घटना व्हायरल झाली. युट्यूबवर आजही ही घडामोड पाहणारे दर्दी क्रिकेटचाहते आहेत. प्रसादने दाखवलेली परिपक्वता आणि आमिर सोहेलचा फाजीलपणा चाहत्यांच्या चिरंतन स्मरणात आहेत. भारत पाकिस्तान सामन्यातल्या सगळ्यात चर्चित घटनांपैकी हा एक प्रसंग झाला.
प्रसाद यांनी ३३ टेस्ट आणि १६१ वनडेत भारताचं प्रतिनिधित्व केलं. टेस्ट आणि वनडे मिळून ३००पेक्षा जास्त विकेट्स त्यांच्या नावावर आहेत. फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये त्यांच्या नावावर ३६१ विकेट्स आहेत. खेळणं थांबवल्यानंतर प्रसाद यांनी भारतीय क्रिकेट संघाचं गोलंदाजी प्रशिक्षकपद भूषवलं. प्रसाद सध्या कर्नाटक क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आहेत. समालोचक तसंच ज्युनियर निवडसमिती सदस्य म्हणूनही त्यांनी काम पाहिलं.
आमिर पाकिस्तानसाठी ४७ टेस्ट आणि १५६ वनडे खेळले. फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये त्यांच्या नावावर १२,०००हून अधिक धावा आहेत. सईद अन्वर आणि आमिर यांची सलामीची जोडी नव्वदच्या दशकात अतिशय लोकप्रिय होती. जगभरात सगळीकडे सातत्याने धावा करणारी ही जोडी होती. खेळाडू म्हणून निवृत्ती घेतल्यानंतर आमिर निवडसमिती प्रमुख म्हणून काम पाहिलं. ते समालोचक म्हणूनही काम करतात.

