टी-२० विश्वचषक २०२१ स्पर्धेत पाकिस्तानने भारतावर विजय मिळवला. या सामन्याचे मूल्यांकन करताना पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू वकार युनूसने धक्कादायक वक्तव्य केले आहे. सामन्यादरम्यान पाकिस्तानचा सलामीवीर फलंदाज मोहम्मद रिझवानने मैदानावरच नमाज अदा केला. या नमाजाबाबत वकारने एका पाकिस्तानी चॅनेलशी संभाषण करताना धक्कादायक वक्तव्य केले. त्याच्या वक्तव्यानंतर भारताचा माजी जलदगती गोलंदाज वेंकटेश प्रसाद आणि प्रख्यात समालोचक हर्षा भोगले निराश झाले. या दोघांनी वकारला ट्वीटद्वारे सुनावले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रिझवानने ‘हिंदूंमध्ये नमाज’ अदा केल्याने वकारला आनंद झाला. तो म्हणाला, “रिझवानने केलेली सर्वात चांगली गोष्ट म्हणजे त्याने मैदानात हिंदूं लोकांमध्ये उभे राहून नमाज अदा केली. त्यामुळे ते खूप खास होते.”

वकारच्या या वक्तव्यानंतर भोगले आपल्या ट्वीटमध्ये म्हणाले, ”वकार युनूससारख्या माणसाचे रिझवानला हिंदूंसमोर नमाज अदा करताना पाहणे त्याच्यासाठी खूप खास होते, हे म्हणणे माझ्या आयुष्यातील सर्वात निराशाजनक गोष्टींपैकी एक आहे. आपल्यापैकी बरेचजण या गोष्टींकडे लक्ष देत नाहीत. पण याबद्दल ऐकून खूप त्रास होतो.”

भोगले पुढे म्हणाले, “मला मनापासून आशा आहे, की पाकिस्तानमध्ये खेळावर खरोखर प्रेम करणारे लोक असतील आणि त्यांना या विधानाचा धोका लक्षात येईल. तेही माझ्या निराशेत सामील होतील. हा फक्त एक खेळ आहे, क्रिकेटचा सामना आहे हे सांगणे आणि लोकांना पटवून देणे माझ्यासारख्या क्रीडाप्रेमींना खूप कठीण जाईल. तुम्हाला क्रिकेटपटू हे खेळाचे राजदूत वाटतात. ते थोडे अधिक जबाबदारीने बोलतील. मला खात्री आहे की वकार या विधानाबद्दल लवकरच माफी मागेल. आपल्याला क्रिकेट जगताला एकत्र करायचे आहे, धर्माच्या आधारावर विभागायचे नाही.”

हेही वाचा – धोनीचा मराठमोळा ‘शिलेदार’! टी-२० वर्ल्डकप सुरू असताना ऋतुराज गायकवाडला मिळाली ‘खास’ जबाबदारी!

वेंकटेश प्रसादनेही वकारला फटकारले आहे. ”एखाद्या खेळात हे सांगण्यासाठी जिहादी मानसिकतेला दुसऱ्या स्तरावर नेले जाते. किती निलाजरा माणूस माणूस आहे”, असे ट्वीट प्रसादने केले आहे.

विश्वचषकाच्या इतिहासात भारताविरुद्ध पाकिस्तानने प्रथमच विजय मिळवला. त्यांनी रविवारी झालेल्या सामन्यात भारताचा १० गडी राखून पराभव केला. पाकिस्तानी मीडियावरील वकारच्या या वक्तव्यानंतर भारतात त्याच्यावर जोरदार टीका होत आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Venkatesh prasad and harsha bhogle slams waqar younis for his bigoted remark on offering namaz adn
First published on: 26-10-2021 at 22:22 IST