अमेरिकेची टेनिसपटू व्हीनस विल्यम्सविरुद्ध मनुष्यवधाचा खटला दाखल केला जाणार आहे. फ्लोरिडात ९ जून रोजी झालेल्या एका मोटार अपघातात ७८ वर्षांच्या वृद्धाचा मृत्यू झाला होता. त्याबद्दल तिला जबाबदार ठरवले जाण्याची शक्यता आहे. पोलिसांनी दिलेल्या अहवालात म्हटले आहे की, रस्त्यावरून मोटार चालवत असताना व्हीनसने अचानक आपल्या मोटारीचा वेग कमी केला. त्यामुळे तिच्या पाठीमागे असलेली मोटार तिच्या मोटारीला धडकली. मोटार चालवत असलेली ६८ वर्षांची महिला व तिचा पती या दोघांनाही गंभीर जखमा झाल्या व त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले; परंतु डोक्याला गंभीर दुखापत झाल्यामुळे वृद्धाचे दोन आठवडय़ांनंतर निधन झाले.

मोटार चालवत असताना व्हीनस ही भ्रमणध्वनीवर बोलत नव्हती किंवा तिने कोणतेही उत्तेजक पेय घेतले नव्हते, असेही पोलिसांनी म्हटले आहे. त्यामुळेच अद्याप तिच्याविरुद्ध खटला दाखल करण्यात आलेला नाही.व्हीनसने पोलिसांना दिलेल्या जबाबात असे म्हटले आहे की, या मार्गावर वाहनांची गर्दी झाली होती. मुळातच ती ताशी आठ किलोमीटर वेगानेच मोटार चालवत होती. तिच्या पाठीमागून येणाऱ्या मोटारीच्या चालकाचेच मोटारीवरील नियंत्रण राहिले नसावे. या दुर्दैवी अपघातात निधन झालेल्या वृद्धाबद्दल दु:ख वाटत असून त्यांच्या कुटुंबीयांच्या दु:खात आपण सहभागी आहोत.