सलग दुसऱ्या टी-२० सामन्यात फलंदाजांनी केलेल्या सुमार कामगिरीमुळे भारतीय संघावर मालिका पराभवाची नामुष्की ओढवली. फिरकीपटू वानिंदू हसरंगाने (४ बळी आणि नाबाद १४ धावा) दिलेल्या अष्टपैलू योगदानाच्या बळावर श्रीलंकेने तिसऱ्या टी-२० क्रिकेट सामन्यात भारताचा ७ गडी आणि ३३ चेंडू राखून धुव्वा उडवला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना भारताने लंकेला फक्त ८२ धावांचे आव्हान दिले. भारताचे आघाडीचे फलंदाज धावा जमवण्यात अपयशी ठरले. त्यानंतर चायनामन फिरकीपटू कुलदीप यादवने नाबाद २३ धावा केल्यामुळे भारताला २० षटकांत जेमतेम ८१ धावांपर्यंत मजल मारता आली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या सामन्यात कुलदीप यादव भारतासाठी सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. टीम इंडियाच्या निराशाजनक कामगिरीवर अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या. अनुभवी समालोचक आणि क्रिकेटचा आवाज म्हणून ओळख असलेल्या हर्षा भोगले यांनीही एक ट्वीट करत टीम इंडियाची कळ काढली. ”जर तुम्ही फलंदाजी करणारे चांगले गोलंदाज असाल, तर अर्ज करा”, असे हर्षा भोगले यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे.

 

श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या टी-२० सामन्यात भारताकडून सलामीवीर ऋतुराज गायकवाड (१४), कर्णधार शिखर धवन (०), देवदत्त पडिक्कल (९), संजू सॅमसन (०), नितीश राणा (६) या फलंदाजांनी सपशेल निराशा केली. याउलट उपकर्णधार भुवनेश्वर कुमारने १६ धावांचे योगदान दिले. लंकेच्या फिरकीसमोर निष्प्रभ ठरलेल्या टीम इंडियाच्या स्टार फलंदाजांपेक्षा कुलदीप २८ चेंडूंचा सामना करत नाबाद राहिला.

हेही वाचा – तब्बल दोन वर्षानंतर मिराबाईने घेतला घरच्या जेवणाचा आस्वाद; शेअर केला फोटो

सामनावीर आणि मालिकावीर पुरस्कार मिळालेल्या हसरंगाने ९ धावांत भारताचे ४ गडी बाद केले. हसरंगाने ऋतुराज गायकवाड, संजू सॅमसन, भुवनेश्वर कुमार आणि वरुण चक्रवर्ती यांचे बळी मिळवले. भारताकडून या लढतीसाठी जायबंदी नवदीप सैनीऐवजी संदीप वॉरिअरला पदार्पणाची संधी देण्यात आली होती.

संक्षिप्त धावफलक

भारत : २० षटकांत ८ बाद ८१ (कुलदीप यादव नाबाद २३, भुवनेश्वर कुमार १६; वानिंदू हसरंगा ४/९, दसून शनाका २/२०) पराभूत वि. श्रीलंका : १४.३ षटकांत ३ बाद ८२ (धनंजया डीसिल्व्हा नाबाद २३, वानिंदू हसरंगा नाबाद १४; राहुल चहर ३/१५)

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Veteran commentator harsha bhogles tweet of send application for team india goes viral adn
First published on: 30-07-2021 at 10:54 IST