अफाट ऊर्जा, अविश्वसनीय सातत्य, चिवट तंदुरुस्ती आणि विजीगिषु वृत्ती या विशेषणाचं मूर्तरुप म्हणजे लिएण्डर पेस. चाळिशीतही ग्रँडस्लॅम जेतेपद नावावर करणाऱ्या पेसने शंभर पुरुष सहकाऱ्यांसह खेळण्याचा विक्रम नावावर केला आहे. हा विक्रम प्रस्थापित करणारा तो ४७वा खेळाडू ठरला आहे. नॉटिंगहॅम स्पर्धेत पेस मार्केल ग्रॅनोलर्सच्या साथीने कोर्टवर उतरला आणि शंभर नंबरी विक्रम नोंदला गेला.
या शंभर सहकाऱ्यांमध्ये पेसची सगळ्यात यशस्वी जोडी ठरली ती भारताच्याच महेश भूपतीशी.  पेसने भूपतीच्या बरोबरीने खेळताना तीन ग्रँडस्लॅम जेतेपदांवर कब्जा केला. राडेक स्टेपानेक आणि ल्युकास डौल्ही या चेक प्रजासत्ताकच्या सहकाऱ्यांसह पेसने प्रत्येकी दोन तर मार्टिन डॅमसह एका ग्रँडस्लॅम जेतेपदावर नाव कोरले.
‘माझी कारकीर्द प्रदीर्घ आहे याचे हा विक्रम प्रतीक आहे. टेनिससारख्या वैयक्तिक खेळात एवढय़ा सहकाऱ्यांसह खेळायला मिळणे अद्भुत आहे. प्रत्येकाकडून मी काहीतरी शिकलो. २५ वर्षांच्या कारकीर्दीत शंभर सहकारी, मी भाग्यवान आहे’, असे पेस म्हणाला.
नुकत्याच झालेल्या फ्रेंच खुल्या स्पर्धेत पहिल्या फेरीतील विजयासह कारकीर्दीत ७०० विजय मिळवणारा पेस केवळ आठवा खेळाडू ठरला होता. मात्र ५० जेतेपदे आणि ७०० विजय हा विक्रम करणारा पेस एकमेव खेळाडू आहे.

पेस-ग्रॅनोलर्स जोडीचे आव्हान संपुष्टात
अव्वल मानांकित लिएण्डर पेस आणि मार्केल ग्रॅनोलर्स यांना एटीपी ऐजॉन खुल्या टेनिस स्पर्धेत पराभवाला सामोरे जावे लागले. बिगरमानांकित ख्रिस गुसिओन आणि आंद्रे सा जोडीने पेस-ग्रॅनोलर्स जोडीवर ६-४, ३-६, १०-७ ने विजय मिळवला. पहिल्या सेटमध्ये गुसिओन-सा जोडीने झंझावाती खेळ केला. दुसरा सेट पेसने जिंकला. मात्र, तिसऱ्या सेटमध्ये टायब्रेकरमध्ये गुसिओन-सा जोडीने  आपला खेळ उंचावत बाजी मारली.