नवी दिल्ली : ज्येष्ठ क्रीडा प्रशासक, ऑलिम्पिकपटू आणि आशियाई खेळांमध्ये भारताला नेमबाजीत पहिले सुवर्णपदक मिळवून देणार्‍या रणधीर सिंग यांचे वयोपरत्वे उद्भवलेल्या आजारांमुळे बुधवारी निधन झाले. ते ७९ वर्षांचे होते. खेळाडू, प्रशासक, संघटक अशा विविध भूमिकांमधून त्यांनी क्रीडा जगताला योगदान दिले.

रणधीर गेल्या काही काळापासून आजारी होते. काही दिवसांपूर्वी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार करण्यात आले होते. त्यानंतर त्यांना घरी सोडण्यात आले. घरीच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात पत्नी (विनिता) आणि तीन मुली (महिमा, सुनैना, राजेश्वरी) असा परिवार आहे. रणधीर यांच्या पार्थिवावर गुरुवारी दुपारी हरिद्वार येथे अंतिम संस्कार केले जाणार आहेत.

रणधीर यांनी प्रकृतीच्या कारणास्तव अलीकडेच आशियाई ऑलिम्पिक परिषदेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. नेमबाज म्हणून निवृत्त झाल्यावर तब्बल चार दशके त्यांनी क्रीडा प्रशासक म्हणून काम केले. आशियाई ऑलिम्पिक परिषद संकटात असताना त्यांनी १९९१ ते २०१५ या कालावधीत सरचिटणीस म्हणून काम पाहिले होते. त्यानंतर २०२४ मध्ये त्यांची चार वर्षांसाठी अध्यक्षपदी निवड झाली होती.

प्रतिष्ठित ऑलिम्पिकपटू, अर्जुन पुरस्कार विजेते, तसेच भारत, आशिया आणि आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीमधील सर्वांत आदरणीय क्रीडा प्रशासकांपैकी एक असलेल्या राजा रणधीर सिंग यांनी नेमबाजी क्रीडा प्रकार आणि ऑलिम्पिक चळवळीच्या विकासात अमूल्य योगदान दिले. त्यांच्या निधनामुळे क्रीडाविश्वात शोककळा पसरली असून, आजी-माजी क्रीडा प्रशासकांसह अव्वल खेळाडूंनी त्यांना आदरांजली वाहिली आणि भारतीय क्रीडाक्षेत्रातील त्यांच्या योगदानाचा गौरव केला आहे.

विक्रमवीर नेमबाज

रणधीर सिंग यांच्या नेमबाज म्हणून उत्कृष्ट कारकीर्दीत पाच ऑलिम्पिक स्पर्धांमधील सहभाग आणि १९७८च्या बँकॉक आशियाई खेळांमधील ट्रॅप प्रकारातील ऐतिहासिक सुवर्णपदकाचा समावेश आहे. त्यांना १९७९ मध्ये अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. त्यांनी टोक्यो १९६४ (राखीव नेमबाज), मेक्सिको १९६८, म्युनिक १९७२, मॉ्ट्रिरयॉल १९७६, मॉस्को १९८० आणि लॉस एंजलिस १९८४ अशा पाच ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले होते.

विश्वासू प्रशासक

प्रशासकीय कारकीर्दीत त्यांनी १९८७ ते २०१० या काळात भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे (आयओए) सरचिटणीस म्हणून काम पाहिले. तसेच २००१ ते २०१४ या काळात त्यांनी आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे (आयओसी) सदस्य म्हणून वेगवेगळ्या जबाबदार्‍या सांभाळल्या. त्यांच्या प्रामाणिक आणि करारी भूमिकेमुळे कायमच त्यांच्याविषयी दरारा राहिला. त्यांच्यावर जबाबदारी सोपविली की यशस्वी पार पाडली जाणार असा त्यांच्याबद्दलचा विश्वास होता. याच विश्वासातून २००३ मध्ये त्यांची दोन वर्षांसाठी जागतिक उत्तेजक प्रतिबंध संस्थेत (वाडा) ‘आयओसी’चे प्रतिनिधी म्हणून निवड झाली होती.

भूपिंदर सिंग यांचे वंशज

पतियाळाचे माजी महाराजा आणि क्रिकेटपटू भूपिंदर सिंग यांचे वंशज असलेले रणधीर सिंग हे भारतातील सर्वांत सुप्रसिद्ध क्रीडा प्रशासकांपैकी एक होते. देशात ऑलिम्पिक चळवळीला चालना देण्याचे श्रेय त्यांना दिले जाते. त्यांचा नेमबाजीचा वारसा त्यांची मुलगी राजेश्वरी हिने पुढे चालू ठेवला आहे. ट्रॅप नेमबाज असलेल्या राजेश्वरीने २०२२च्या आशियाई खेळांमध्ये रौप्यपदक आणि २०१६च्या आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले आहे. दुसरीकडे, सुनैना हिने २०१८ मध्ये ‘आयओए’ची उपाध्यक्ष बनून क्रीडा प्रशासनात आपले स्थान निर्माण केले. ती ‘आयओए’च्या आंतरराष्ट्रीय संबंध आणि शिक्षण समितीची सदस्य देखील आहे.