दूरचित्रवाणीची सुविधा प्रचलित नसतानाही रेडिओद्वारे क्रिकेटचे सुरेख वर्णन करणारे समालोचक आणि नावाजलेले क्रीडा पत्रकार डिकी रत्नागर यांचे लंडनमध्ये निधन झाले. मृत्यूसमयी ते ८२ वर्षांचे होते. २८ फेब्रुवारी १९३१ या दिवशी जन्मलेल्या रत्नागर यांनी क्रिकेट समालोचक म्हणून ५० वर्षांपेक्षा जास्त काळ काम करताना तीनशेहून अधिक कसोटींचे समालोचन केले. १९५८ ते १९६६ या कालावधीत क्रिकेट पत्रकार म्हणून त्यांनी भारतातील ‘हिंदुस्तान टाइम्स’मध्ये काम केले. त्यानंतर ते लंडन येथे स्थायिक झाले. तिथे त्यांनी फक्त काऊंटी क्रिकेटचेच वृत्तांकन केले नाही तर स्क्वॉश आणि बॅडमिंटन या खेळांवरही ‘डेली टेलीग्राफ’ या वृत्तपत्रात विपुल लेखन केले. रत्नागर यांनी ‘कसोटी क्रिकेट समालोचन’ (भारत वि. इंग्लंड १९७६-७७) आणि ‘खान्स अनलिमिटेड’ (पाकिस्तानमधील स्क्वॉशचा इतिहास) अशी दोन पुस्तकेही लिहिली. भारताचे माजी फिरकी गोलंदाज बिशनसिंग बेदी यांच्यासह भारत आणि ब्रिटनमधील अनेक पत्रकारांनी सोशल मीडियावर रत्नागर यांच्या निधनामुळे दु:ख प्रकट केले.