गणेश सतीश आणि आणि अथर्व तायडेच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर विदर्भाने इराणी करंडकाच्या अखेरच्या दिवशी शेष भारतावर पहिल्या डावातील आघाडीच्या जोरावर विजय मिळवला आहे. शेष भारताने दिलेलं २८० धावांचं आव्हान विदर्भाच्या फलंदाजांनी संयमीपणे फलंदाजी करत पूर्ण करत आणलं होतं. मात्र दुसऱ्या डावात गणेश सतीश बाद झाल्यानंतर दोन्ही कर्णधारांनी एकमताने सामना थांबवण्याचा निर्णय घेतला, यानंतर विदर्भाने पहिल्या डावातील आघाडीच्या जोरावर सामन्यात विजय मिळवला. विदर्भाचं हे इराणी करंडकाचं सलग दुसरं विजेतेपद ठरलं आहे. काही दिवसांपूर्वी विदर्भाने रणजी करंडकाच्या अंतिम फेरीत सौराष्ट्रावर मात करत सलग दुसऱ्यांना रणजी करंडक पटकावण्याचा बहुमान मिळवला होता.

पहिल्या डावात आदित्य सरवटे आणि अक्षय वाखरेच्या गोलंदाजीच्या जोरावर शेष भारताचा संघ ३३० धावांपर्यंत मजल मारु शकला. पहिल्या डावात मयांक अग्रवालने ९५ तर हनुमा विहारीने ११४ धावांची खेळी करत आपलं योगदान बजावलं. याला प्रत्युत्तर देताना विदर्भाने पहिल्या डावात ४२५ धावांपर्यंत मजल मारत पहिल्या डावात ९५ धावांची बहुमुल्य आघाडी घेतली. विदर्भाकडून अक्षय कर्णेवारने १०२ धावांची शतकी खेळी केली. त्याला अक्षय वाडकर, संजय रामास्वामी यांनी अर्धशतकी खेळी करुन चांगली साथ दिली.

दुसऱ्या डावात शेष भारताची सुरुवात डळमळती झाली. मयांक अग्रवाल आणि अनमोलप्रीत सिंह हे फलंदाज स्वस्तात माघारी परतले. मात्र यानंतर कर्णधार अजिंक्य रहाणे आणि हनुमा विहारी यांनी तिसऱ्या विकेटसाठी द्विशतकी भागीदारी रचत संघाचा डाव सावरला. हनुमा विहारीने सलग दुसऱ्या डावात शतकी खेळी करत आपल्या नावावर विक्रमाची नोंद केली. तो १८० धावांवर नाबाद राहिला. त्याला अजिंक्य रहाणेने ८७ तर श्रेयस अय्यरने नाबाद ६१ धावा काढत चांगली साथ दिली. शेष भारताने आपला दुसरा डाव ३७४/३ ला घोषित करत विदर्भाला २८० धावांचं आव्हान दिलं.

विजयासाठी मैदानात उतरलेल्या यजमान विदर्भाची सुरुवातही डळमळती झाली. कर्णधार फैज फजल भोपळाही न फोडता माघारी परतला. मात्र यानंतर संजय रामास्वामी, अथर्व तायडे आणि गणेश सतीश यांनी छोट्या-छोट्या भागीदारी रचत विदर्भाला विजयाच्या नजीक नेलं. मात्र विजयासाठी ११ धावा हव्या असताना दोन्ही कर्णधारांनी सामना अनर्णित राखण्यावर एकमत केलं. यानंतर विदर्भाने पहिल्या डावातील आघाडीच्या जोरावर सामन्यात विजय मिळवला.