दमदार सांघिक प्रदर्शनाच्या बळावर विदर्भच्या शिलेदारांनी विजय हजारे चषक स्पर्धेत दिल्लीला नमवत उपांत्य फेरी गाठली. बंगळुरूस्थित नॅशनल क्रिकेट अकादमीतील दुसऱ्या क्रमांकाच्या मैदानावर झालेल्या लढतीत विदर्भने दिल्लीवर ७६ धावांनी विजय मिळवला.
दिल्लीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. विदर्भच्या फलंदाजांनी चिवटपणे फलंदाजी करत ३०० धावांची मजल मारली. यश राठोडने ८ चौकार आणि २ षटकारांसह ८६ धावांची खेळी केली. अथर्व तायडेने ६२ तर ध्रुव शोरेने ४९ धावा करत त्याला चांगली साथ दिली. दिल्लीतर्फे इशांत शर्मा, नवदीप सैनी, प्रिन्स यादव आणि नितीश राणा यांनी प्रत्येकी २ विकेट्स पटकावल्या.
ऋषभ पंत आणि आयुष बदोनी यांची उणीव दिल्लीला प्रकर्षाने जाणवली. अनुज रावतने ६६ धावांची एकाकी झुंज दिली. विदर्भतर्फे नचिकेत भुटेने ४ तर हर्ष दुबेने ३ विकेट्स घेतल्या. विदर्भने आतापर्यंत एकदाही विजय हजारे ट्रॉफीवर नाव कोरलेलं नाही. अंतिम फेरीत त्यांनी एकदा धडक मारली होती.
अन्य लढतीत पंजाबने मध्य प्रदेशवर १८३ धावांनी दणदणीत विजय मिळवला. पंजाबने प्रथम फलंदाजी करताना ३४५ धावांचा डोंगर उभारला. कर्णधार आणि विकेटकीपर प्रभसिमरन सिंगने १० चौकार आणि २ षटकारांसह ८८ धावांची तडाखेबंद खेळी केली. हरनूर सिंग (५१), अनमोलप्रीत सिंग (७०), नेहल वढेरा (५६) यांनी वेगवान अर्धशतकी खेळी केल्या. प्रत्युत्तरादाखल खेळताना मध्य प्रदेशचा डाव १६२ धावांतच आटोपला. रजत पाटीदारने सर्वाधिक ३८ धावा केल्या. पंजाबतर्फे सन्वीर सिंगने ३ तर क्रिश भगत, गुरनूर ब्रार आणि रमणदीप सिंग यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या.
पंजाबनेही एकदाही या स्पर्धेचं जेतेपद पटकावलेलं नाही.
क्वार्टर फायनलच्या अन्य लढतीत कर्नाटकने मुंबईवर ५५ धावांनी विजय मिळवत उपांत्य फेरी गाठली. सौराष्ट्रने उत्तर प्रदेशला १७ धावांनी नमवलं. उपांत्य फेरीच्या एका लढतीत विदर्भसमोर कर्नाटकचं आव्हान आहे तर सौराष्ट्रचा मुकाबला पंजाबशी होणार आहे. कर्नाटकने पाचवेळा तर सौराष्ट्रने दोनदा या स्पर्धेचं जेतेपद पटकावलं आहे.
विदर्भची उपांत्य फेरीपर्यंतची वाटचाल
वि. बंगाल- पराभूत
वि. हैदराबाद- ८९ धावांनी विजयी
वि. जम्मू काश्मीर- ५ विकेट्सनी विजयी
वि. चंदीगढ- ८ विकेट्सनी विजयी
वि. बडोदा- ९ विकेट्सनी विजयी
वि. उत्तर प्रदेश- पराभूत
वि. आसाम- १६० धावांनी विजयी
वि. दिल्ली- ७६ धावांनी विजयी
