दुबईत होणाऱ्या आशिया चषक क्रिकेट स्पर्धेसाठी भारतीय संघ दुबईमध्ये दाखल झाला आहे. २७ ऑगस्टपासून ही स्पर्धा रंगणार असून रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ २८ ऑगस्टला पाकिस्तानविरुद्धच्या सामान्याने या मालिकेचा श्रीगणेशा करणार आहे. पारंपारिक प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तानविरुद्धच्या या सामन्याची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. या सामन्याबद्दल चाहत्यांमध्ये उत्सुकता असतानाच दुसरीकडे दुबईमध्ये दोन्ही संघांचे खेळाडू नुकतेच एकमेकांना भेटले. यावेळी अफगाणिस्तानच्या संघातील खेळाडूही उपस्थिती होतो.

बीसीसीआयने सोशल मीडियावर अपलोड केलेल्या व्हिडीओमध्ये हार्दिक पांड्या, युजवेंद्र चहल हे रशिद खान, महोम्मद नबी यांच्याशी गप्पा मारताना दिसत आहेत. मात्र यामधील सर्वाधिक चर्चेत आहे की विराट कोहली आणि पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमची भेट.

सध्याच्या आयसीसीच्या आकडेवारीनुसार बाबर हा जगातील आघाडीचा फलंदाज आहे. तर दुसरीकडे विराट कोहली सातत्यपूर्ण कामागिरी न करु शकल्याने आपली लय शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. या दोन्ही खेळाडूंची तुलना त्यांच्या चाहत्यांकडून केली जाते. मात्र आता भारत पाकिस्तान सामन्याच्या पार्श्वभूमीवर पुन्हा या दोन्ही खेळाडूंच्या कामागिरीची तुलना होऊ लगाली आहे. तुम्हीच पाहा या दोघांच्या भेटीचा हा व्हिडीओ…

नुकतीच कोहलीने ‘स्टार स्पोर्टस’च्या ‘गेम प्लान’ या कार्यक्रमामध्ये विशेष मुलाखत दिली. यामध्ये त्याने त्याच्या कामगिरीसंदर्भात भाष्य करताना, “क्रिकेटमधील माझ्या प्रदीर्घ अपयशाचे खास असे कारण नाही. पण परिस्थितीचा सामना करण्याची क्षमता नसती, तर मी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये टिकलोच नसतो,” असं म्हटलं आहे. गेल्या तीन वर्षांत आंतरराष्ट्रीय स्तरावर कोहलीला शतकी खेळी करता आलेली नाही. याचसंदर्भात कोहलीने, “‘‘या गोष्टींचा विचार करत बसणे मला पटत नाही. माझे तंत्र चुकत असल्याचीही चर्चा आहे. पण, असेही नाही. माझा खेळ कसा आहे आणि मी कसा खेळतोय, याची मला पूर्ण माहिती आहे. वेगवेगळ्या गोलंदाजांचा सामना करण्याची आणि परिस्थितीनुसार खेळण्याची क्षमता माझ्यात होती म्हणूनच मी आंतरराष्ट्रीय स्तरावर इतकी वर्षे टिकू शकलो,’’ असं मत व्यक्त केलं आहे.

‘‘माझ्याकडे क्षमता होती, त्यानुसार मी त्यावर मात केली. आशिया चषकासाठी मी सज्ज झालो आहे. माझ्यासमोर सातत्य दाखवण्याचे आव्हान आहे. यातून बाहेर पडण्यासाठी आजपर्यंतचा अनुभव कामी येईल,’’ असा विश्वासही कोहलीने व्यक्त केला.