scorecardresearch

Rishabh Pant Accident: “ऋषभ, तुला आता त्रास होणार नाही…”, राहुल द्रविड-पांड्याने पंतला पाठवला भावनिक संदेश

बीसीसीआयने मंगळवारी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला. यामध्ये प्रशिक्षक आणि संघातील सदस्यांनी पंतचे फायटर असे वर्णन केले.

Rishabh Pant Accident: “ऋषभ, तुला आता त्रास होणार नाही…”, राहुल द्रविड-पांड्याने पंतला पाठवला भावनिक संदेश
सौजन्य- बीसीसीआय (ट्विटर)

भारताचा यष्टिरक्षक-फलंदाज ऋषभ पंतचा शुक्रवारी (३० डिसेंबर) पहाटे दिल्लीहून त्याच्या मूळ गावी रुरकीला जात असताना भीषण कार अपघात झाला. पंत यांची कार दुभाजकावर आदळली आणि आग लागली, त्यामुळे त्यांना कारची खिडकी तोडून वाहनातून बाहेर पडावे लागले. सुदैवाने हरियाणा रोडवेजचा एक बस चालक आणि वाहक अपघाताच्या ठिकाणी त्वरित पोहोचला आणि त्याला रुग्णालयात पोहोचवण्यास मदत केली.

डोक्याला, पाठीला आणि पायाला अनेक दुखापत झाल्याने ऋषभवर सध्या डेहराडून येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. रिपोर्ट्सनुसार, तो किमान सहा महिने मैदानाबाहेर असेल. दरम्यान, मंगळवारी (३ जानेवारी) श्रीलंकेविरुद्धच्या टी२० मालिकेसाठी निवडलेल्या भारतीय संघाने पंतसाठी हृदयस्पर्शी संदेश शेअर केला आणि त्याला लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या.

भारताचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड बीसीसीआयने पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये म्हणतात की, “ऋषभ, तुला आता फारसा त्रास होणार नाही अशी आशा करतो. तू लवकर बरा होशील अशी आशा आहे. गेल्या एका वर्षात मला तुला भारतीय कसोटी इतिहासातील काही महान खेळी खेळताना पाहण्याचा बहुमान मिळाला आहे. जेव्हाही आम्ही कठीण परिस्थितीत होतो तेव्हा तू या कठीण परिस्थितीतून स्वत:ला बाहेर काढण्याचे पात्र साकारायचा. हे देखील असेच एक आव्हान आहे, मला माहित आहे की तु अनेकवेळा हे केले आहे तसे तु लवकरच मैदानात परत उतरणार आहेस.”

भारताचा नवा टी२० कर्णधार हार्दिक पांड्याने देखील ‘फायटर’ पंतला लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या. “हाय ऋषभ, तुला लवकर बरे वाटावे अशी माझी इच्छा आहे. मला माहीत आहे की तू एक लढवय्या आहेस आणि गोष्टी तुला आवडतीलच अशा नसतात, पण जीवन हे जीवन आहे. तू सर्व दरवाजे तोडून परत येशील जसे तू नेहमी होतास. माझे प्रेम आणि शुभेच्छा तुझ्या पाठीशी आहेत. संपूर्ण संघ आणि देश तुझ्या पाठिशी आहे,” असे हार्दिक म्हणाला.

उपकर्णधार सूर्यकुमार यादव यानेही पंतला शुभेच्छा दिल्या. तो म्हणतो, “तू लवकरात लवकर बरे व्हावे यासाठी माझ्या सदिच्छा कायम तुझ्यासोबत असतील. मला माहीत आहे की सध्या काय परिस्थिती आहे. आम्हाला इथे तुझी आठवण येते आणि तुझी परत येण्याची खूप जास्त वाट पाहू शकत नाही. तू मैदानावर नेहमीच लढवय्या होता आणि मला माहीत आहे की तू लवकरच परत येणार.”

आपल्या संदेशात रिस्ट-स्पिनर युझवेंद्र चहल म्हणतो, “लवकर बरा हो, आपण एकत्र चौकार आणि षटकार मारू.” यष्टिरक्षक-फलंदाज इशान किशन आणि सलामीवीर शुबमन गिल यांनीही ऋषभ पंतला शुभेच्छा दिल्या. ते म्हणतात, “भारतीय क्रिकेट संघाच्या वतीने, तुला लवकरात लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा आणि खूप प्रेम. आम्हा सर्वांना माहित आहे की तू यातून नक्कीच मार्ग काढणार आहेस. तुला लवकरच भेटण्याची आशा आहे.”

हेही वाचा: IND vs SL: “मी गावसकर-तेंडुलकर पाहिले पण खूप खास…”, माजी प्रशिक्षक ‘मिस्टर ३६०’ सूर्यकुमार यादवचे केले कौतुक

तत्पूर्वी, बीसीसीआयने एक निवेदन जारी केले होते की, बोर्ड पंतला या त्रासदायक टप्प्यातून बाहेर पडण्यासाठी पाठिंबा देईल. “बीसीसीआय ऋषभच्या कुटुंबाच्या सतत संपर्कात आहे तर वैद्यकीय पथक सध्या ऋषभवर उपचार करत असलेल्या डॉक्टरांच्या जवळच्या संपर्कात आहे. ऋषभला शक्य तितकी सर्वोत्कृष्ट वैद्यकीय सेवा मिळावी आणि या अत्यंत क्लेशकारक टप्प्यातून बाहेर येण्यासाठी त्याला आवश्यक ते सर्व सहकार्य मिळावे यासाठी बोर्ड लक्ष देईल,” असे निवेदनात म्हटले आहे.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 03-01-2023 at 15:16 IST

संबंधित बातम्या